मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून झाले पुनर्वसन; राजकुमारचा नवजीवन प्रवास
नगर (प्रतिनिधी)- आळेफाटा परिसरातील रस्त्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी एक बेघर, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण एकटाच फिरताना दिसला. कोणतीही ओळख नसलेला, संवादास असमर्थ, हरवलेला आणि अर्धवट स्थितीत असलेला हा तरुण सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार यांच्या दृष्टीस पडला आणि त्यानंतर सुरू झाला एका हरवलेल्या आयुष्याचा नव्याने उभारणीचा प्रवास.
शेलार यांनी त्वरित पुढाकार घेत त्याला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार, समुपदेशन, प्रेमळ वातावरण व संस्थेतील स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा तरुण हळूहळू सावरू लागला.
उपचारादरम्यान, काही महिन्यांनंतर त्याने स्वतःचे नाव राजकुमार असल्याचे सांगितले. सातत्याने समुपदेशन घेत असताना तो हळूहळू संवाद करू लागला आणि ही माहिती मिळाली की, तो मूळचा नेपाळ येथील आहे. या धाग्याला धरून श्री अमृतवाहिनी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अंबादास गुंजाळ व मंगेश थोरात यांनी तपास सुरू केला.
सततच्या पाठपुराव्याने राजकुमारच्या ओळखीची खात्री करून त्याला अखेर नेपाळमधील मूळ कुटुंबाशी संपर्क करून, सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले. त्याच्या नातेवाईकांनी आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी संस्थेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
राजकुमारच्या या संपूर्ण उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेमध्ये अंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, ऋतिक बर्डे, बाळासाहेब घुंगरे, सोमनाथ बर्डे, मथुरा जाधव-बर्डे व शोभा दुधवडे या स्वयंसेवकांनी अतुलनीय परिश्रम घेतले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने केवळ वैद्यकीय मदतच दिली नाही, तर एक हरवलेले जीवन नव्याने जगण्यास शिकवले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतोय.
मानसिकदृष्ट्या आजारी, बेघर आणि असहाय्य रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ही संस्था जे कार्य करते आहे, ते खऱ्या अर्थाने मानवतेचे दर्शन घडवणारे असल्याची भावना राजकुमारच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. आम्ही आमचा मुलगा केव्हाच गमावला होता, पण या संस्थेमुळे तो पुन्हा भेटला. आमचं घर पुन्हा आनंदाने भरून गेलं असल्याची भावनिक प्रतिक्रिया कुटुंबीयांणी दिली.