अन्याय विरोधात एकवटण्याची हाक
संघटन हेच समाज उभारणीला खऱ्या अर्थाने दिशा देणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नंदिवाले तिरमल समाज संघटनेच्या जाहिर मेळाव्यात महाराष्ट्रातून आलेले समाजबंधव एकवटले. या मेळाव्याला समाजबांधवांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात समाजातील एकता, संघटनशक्ती आणि सामाजिक न्याय या विषयांवर विचारमंथन झाले. तर अन्याय विरोधात एकवटण्याची हाक देण्यात आली.
पांढरीपूल येथील तुकाई मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. या मेळाव्यास एकनाथराव आटकर (अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य) आणि शिवाजीराव आण्णा पालवे (उपाध्यक्ष, संभाजीनगर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत गुलाबराव दगडू पालवे (सचिव) आणि बाबासाहेब आव्हाड (खजिनदार) हे राज्य पदाधिकारीही मंचावर उपस्थित होते.
एकनाथराव आटकर म्हणाले की, समाजावर अन्याय होत आहे, पण आपण गप्प नाही बसणार. आपली ताकद, आपला आवाज आणि आपलं संघटन हेच समाज उभारणीला खऱ्या अर्थाने दिशा देणार आहे. एकत्र आलोय, पण ही केवळ सुरुवात आहे.पुढच्या टप्प्यात सर्व समाज, संघटना एका छत्राखाली आणून प्रश्न सोडविण्याचे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात महिला आघाडी महाराष्ट्र राज्य विभागाने सक्रीय सहभाग घेतला. अलका सूर्यभान पालवे (छत्रपती संभाजीनगर), हौसाबाई गुलाब पालवे, विमल बाबासाहेब आव्हाड, आणि गंगुबाई शिवराम पालवे या महिलांनी उपस्थित राहून समाजातील महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि नेतृत्वाच्या गरजेवर विचार मांडले. महिला शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टींवर समाजाने आता ठोस पावलं उचलायची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुम भी देखोगे आँखों से, हम भी आयेंगे हजारों से… आता नाहीतर कधी? या प्रेरणादायी घोषवाक्याने सभागृह दणाणले. कार्यक्रमादरम्यान समाज जनगणना नोंदणीसाठी फॉर्मचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समाजातील लोकसंख्या, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक स्थिती यासंबंधी अचूक माहिती गोळा होणार आहे. यामुळे शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक संधी, रोजगार आणि आरक्षण या क्षेत्रात समाजाला ठोस प्रतिनिधित्व मिळेल, अशी माहिती आयोजकांनी दिली. या दरम्यान समाजातील ज्येष्ठ आणि तरुण बांधवांमध्ये स्नेहसंवाद घडून आला.
या मेळाव्यात अहिल्यानगर, नाशिक, पुणे तसेच संभाजीनगर या जिल्ह्यांसह तालुकास्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काळू हटकर, भारत फुलमाळी, रावसाहेब जाधव, गंगा मल्ले, पप्पू हटकर, रामा फुलमाळी, रमेश गजरे, अंकुश फुलमाळी, बाबू गुंडाळे, सुभाष फुलमाळी, बाळू फुलमाळी, किसन आहेर, सुभाष आहेर, बाबू फुलमाळी, भाना औटी, दगडू औटी, गुलाब फुलमाळी, उत्तम फुलमाळी, गंगाधर पालवे, अण्णा गायकवाड, संपत फुलमाळी, रावसाहेब फुलमाळी, शेटीबा देशमुख, रघु आव्हाड, सुरेश पालवे, राजू पवार, बाजीराव पवार, गंगा पवार, गंगाराम गुंडाळे, चिनू फुलमाळी, साहेबराव फुलमाळी, शिवाजी पालवे, राहुल पालवे, रावसाहेब पालवे, बाबू कुंदारे, बाबू काकडे, मच्छिंद्र फुलमाळी, अनिल गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, शिवा गायकवाड आणि अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कालापहाड यांनी केले.