दहावी व बारावी बोर्डाचा 100 टक्के निकाल
118 मुली विशेष प्राविण्याने उत्तीर्ण; गौरी काळे 97 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला. 21 वर्षांपासूनची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवून विद्यालयातील 118 मुली विशेष प्राविण्याने व 70 मुली प्रथम श्रेणीत तर 15 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. गौरी संतोषकुमार काळे हिने 97 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. रिया प्रविण बोरा व वैष्णवी संतोष औशिकर या दोघींनी 96.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रणाली आदिनाथ शिंदे 95.40 गुण घेवून तिसरी आली.
तसेच शाळेचा इयत्ता 12 वीचा निकाल देखील 100 टक्के लागला आहे. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव बबनराव कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्या वासंती धुमाळ, सखाराम गारुडकर, बबन साळवे, संजय निक्रड, राजेश सोनवणे,जालिंदर सातपुते,नामदेव वायळ,छाया सुंबे,जयश्री कोतकर, भारती गुंड, वनिता देवकर, राजश्री पालवे, समृद्धी लटके, देविदास हारवणे,आणि प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गुंड यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, सचिव बबनराव कोतकर, सहसचिव रावसाहेब सातपुते, खजिनदार प्रल्हाद साठे,दगडू साळवे आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
बबनराव कोतकर म्हणाले की, मुली या शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून, आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. परंतु अजून देखील अनेक ठिकाणी मुलींना जी मदत पाहिजे ती प्राप्त होत नाही. मुलगी आहे म्हणून, तिला दुय्यम स्थान दिले जाते, ग्रामीण भागात घरची परिस्थिती बिकट असताना मुलींना शाळेतून काढण्यात येते. अशा परिस्थितीत मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुलींशी संवाद साधून त्यांना विद्यालयाकडून लागेल ती मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागून व आपल्या विद्यालयाची मुलगी केडगावात प्रथम आल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयाच्या प्राचार्या वासंती धुमाळ यांनी मार्गदर्शक केले. यावेळी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचा सन्मान संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.