• Mon. Jan 26th, 2026

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 2017 च्या अर्जात 2019 प्राप्त होणाऱ्या प्रमाणपत्राचा उल्लेख

ByMirror

Oct 18, 2024

त्या कोपरगावच्या शिक्षिकेची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी

नव्याने रुजू झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्रामुळे जिल्हा रुग्णालय राज्यभर चर्चेत असताना, त्यामध्ये आनखी भर टाकणारी घटना म्हणजे 2017 मध्ये एका शिक्षिकेने केलेल्या अर्जात 2019 मध्ये प्राप्त होणाऱ्या प्रमाणपत्राचा उल्लेख केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकेची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी रिपाईच्या शिष्टमंडळाने नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रिपाई ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, संदीप वाघचौरे, लखन सरोदे, स्वप्नील साठे, विशाल भिंगारदिवे, अजय बडोदे, आबा आल्हाट आदी उपस्थित होते.


कोपरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेने स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 22 फेब्रुवारी 2017 रोजी नोंदणी केली होती. त्यादिवशी केलेल्या नोंदणी दिव्यांग डिटेल्स मध्ये दोन वर्षानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा उल्लेख करण्यात आलेला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. दोन वर्षानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा नंबर व दिनांक त्यांना अगोदरच कसा माहिती झाला?, 2017 चे रजिस्ट्रेशन मध्ये 2019 ला मिळणारा सर्टिफिकेटचा उल्लेख हे अनाकलनीय आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र त्यांनी बनावट पध्दतीने मिळवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


सदर शिक्षिकेला दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याचे जिल्हा मेडिकल बोर्डाने नाकारल्याचे 5 ऑगस्ट 2023 रोजी कळविले आहे. त्यामुळे त्यांनी 2017 साली स्वावलंबन योजनेतून नोंदणी करताना माहिती म्हणून भरलेल्या 2019 च्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपशीलची सत्यता पडताळण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *