बालघरच्या निराधार, वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना दिली दिवाळी भेट
फराळ, फटाके, दैनंदिन वापरातील वस्तू व खेळण्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील निराधार, वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी यशवंती मराठा महिला मंडळाच्या सदस्या दिवाळी भेट घेऊन पोहचल्या. बालघरातील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या तोंडावर फराळ, फटाके, दैनंदिन वापरातील वस्तू व खेळण्यांची भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.
निराधार, वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना देखील दिवाळी सण आनंद व उत्साहाने साजरा करता यावा, या भावनेने यशवंती मराठा महिला मंडळाच्या सदस्यांनी वचित घटकातील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा मायाताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर गीतांजली काळे, कार्याध्यक्षा तथा माजी महापौर शीलाताई शिंदे, शहराध्यक्ष मीराताई बारस्कर, खजिनदार मंगल शिर्के, माजी अध्यक्षा आशाताई शिंदे, उपाध्यक्षा डॉ. संध्या इंगोले, जिल्हा सचिव लिना नेटके, शहर सचिव सारिका गाडे, मंगल शिरसाठ, अनिता मोरे, उषा गहिले, मेघा झावरे, विद्या काळे, रूपाली ताकटे, सुलक्षणा आडोळे, शैला थोरात, राधिका शेलार, ज्योती गंधाडे, कांता कवडे आदींसह महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. बालघरातील मुलींच्या हस्ते राजमाता जिजाऊंचे प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. बालघर प्रकल्पातील निराधार, वंचित व गरजू घटकातील मुलांच्या जीवनाला दिशा देणारे प्रकल्पाचे संचालक योगेश गुंड यांचा यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर असलेल्या गीतांवर नृत्य सादर केले.

मायाताई कोल्हे म्हणाल्या की, जीवनात दीपप्रमाणे इतरांना प्रकाश देण्यासाठी जगावे. देण्याचा आनंद घेण्यात नसतो. देण्याचे कार्य मोठे असून, जीवनात देणारे बनावे. जगातून गेल्यानंतरही आपले नाव राहिले पाहिजे, यासाठी चांगले काम करावे. संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असून, त्यावर मात करुन आपले ध्येय साधण्याचे त्यांनी आवाहन केले. तर हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला वेगळी पार्श्वभूमी असल्याचे सांगून त्यांनी दिवाळी, नरक चतुर्दशी, भाऊबीज, पाडवा, बलिप्रतिप्रदा याचे महत्त्व सांगितले.

माजी उपमहापौर गीतांजली काळे व माजी महापौर शीलाताई शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक करुन प्रत्येकाने वंचितांची दिवाळी साजरी करुन मग आपली दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बालघरातील स्वयंपाकीन शेटे मावशी यांना दिवाळीसाठी साडी भेट देण्यात आली. तर सर्व विद्यार्थ्यांना फराळ, फटाके, दैनंदिन वापरातील वस्तू व खेळण्यांचे वाटप करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करुन वंचितांच्या अंगणात दिवाळीचा पहिला दिवा महिलांनी प्रज्वलीत केला.
