महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेवर वेधले लक्ष
शाळांच्या दुरावस्थेचे प्रश्न सोडविण्याचे उपायुक्तांचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या शाळांची झालेली दुरावस्थेच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी अहिल्यानगरच्या वतीने महापालिके समोर झोपा काढो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगले यांनी महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेसंदर्भात तातडीने प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळास दिले असून, आपच्या आंदोलनाला यश आले आहे.
आपच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या, शाळेची दुरावस्था, शौचालयाची परिस्थिती व पिण्याच्या पाण्याची अवस्था आणि शालेय परिसरात असलेली अस्वच्छतेबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती.
यासंदर्भात कारवाई होत नसल्याने नुकतेच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांच्या नेतृत्वाखाली झोपा काढो आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये आपचे राज्य सचिव सुभाष केकाण, जिल्हा प्रवक्ता ॲड. महेश शिंदे, महिला शहराध्यक्ष ॲड. विद्याताई शिंदे, राम लाड, रजनीताई ताठे, शंकर गोरे, सुनील ठाकरे, सिताराम खाकाळ, सचिन एकाडे, बाळासाहेब थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आपचे राज्यसचिव सुभाष केकाण यांनी महानगरपालिकेच्या तसेच सरकारी शाळांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. शिक्षणाच्या पवित्र कार्यात देखील अनागोंदी सुरु आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. आम आदमी पार्टीचे पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शिक्षण क्षेत्रात केलेले अमुलाग्र बदल आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आदर्श घेण्याचे स्पष्ट केले. तर आपच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीन विकास साधला जाणार असून, जनतेच्या सेवेसाठी आपच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे ते म्हणाले.