वधू-वर पालकांसह समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- विवाह संस्था टिकवून राहणे, शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे, फक्त शासकीय नोकरीतील मुलगा पाहिजे असा अट्टाहास सोडून उद्योग व्यवसायात काम करणारे, स्वयंरोजगार करणाऱ्या युवकांनाही वधू पित्याने व वधूने पसंती प्राधान्य क्रमाने विवाह केले जावे, यासाठी विशेष व्याख्यानासह माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
13 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात वधू-वर मेळावा होणार आहे. या मेळाव्यात इच्छुक वधू-वर पालकांसह समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन ॲड. महेश शिंदे, पोपटराव बनकर, गणेश बनकर, स्वाती डोमकावळे यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरात जनवार्ता परिवाराने 35 विवाह जमवण्याची किमया वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून पार पाडली आहे. हा सहावा वधू वर मेळावा आहे. प्रथम वधू-वर, घटस्फोटीत विधवा, विधूर अपत्य, विनाअपत्य, दिव्यांग, मतिमंद, आंतरजातीय अशा सर्वांसाठी माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले असून, वधूसाठी कायमस्वरूपी मोफत नोंदणी केली जाणार आहे.
5 एप्रिल पर्यंत आपले बायोडाटा, तीन प्रतीत फोटो, आधार कार्डसह ॲड. महेश शिंदे, पावन गणपती मंदिरा शेजारी, जुन्या कोर्टामागे टांगे गल्ली येथे नाव नोंदणी करावी, तर उशीरा आलेले बायोडाटा स्वीकारले जाणार नसल्याचे म्हंटले आहे. अधिक माहितीसाठी 9004722330 व 9921810096 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.