• Sun. Mar 1st, 2026

राजयोगा मेडिटेशनद्वारे मन सकारात्मक करा; डॉक्टरांना आवाहन

ByMirror

Aug 12, 2025

मेडिसिनसोबत मेडिटेशनचीही गरज -मंजू दीदी

हृदयविकार, तणावावर उपाय म्हणजे रोजचे मेडिटेशन

नगर (प्रतिनिधी)- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय व मेडिकल विंग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रथमच द जर्नी फ्रॉम मेडिसिन टू मेडिटेशन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माउंट आबू (राजस्थान) येथील मंजू दीदी यांनी प्रमुख प्रवक्ते म्हणून उपस्थित होत्या.


मंजू दीदी म्हणाल्या की, आज प्रत्येक व्यक्तीमध्ये होणारे भावनिक आणि नकारात्मक बदल समाजावर विपरीत परिणाम घडवतात. या कारणामुळे आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. समाजाला आज सर्वाधिक गरज आहे ती सकारात्मक भावनांची, आणि ती साध्य करण्यासाठी मेडिसिनसोबत मेडिटेशन अत्यंत आवश्‍यक आहे.


ब्रह्माकुमारी विद्यालयात शिकवला जाणारा राजयोगा मेडिटेशन कोर्स मन परिवर्तन करून त्याला सकारात्मकतेकडे वळवतो, असे सांगून दीदींनी उपस्थितांना मेडिटेशनचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सर्वांसोबत प्रत्यक्ष मेडिटेशनही करण्यात आले. तसेच, माउंट आबू येथे मेडिकल विंगतर्फे होणाऱ्या सेमिनारसाठी सर्वांना निमंत्रण दिले.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नोबल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी, वाढत्या हृदयविकारामागील कारणांवर प्रकाश टाकला. सध्याची वाढती स्पर्धा, इर्षा, तणाव आणि बदलती जीवनशैली ही गंभीर कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. हृदयविकारापासून मुक्त होण्यासाठी दररोज मेडिटेशन करणे अत्यावश्‍यक असल्याचे सांगून सर्व डॉक्टरांना राजयोगा मेडिटेशन शिकण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दीदी होत्या. आपल्या आशीर्वचनात त्यांनी समाजात डॉक्टरांचे स्थान सर्वोच्च असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. तणावमुक्त राहून निस्वार्थपणे सेवा देण्यासाठी डॉक्टरांनी वेळ काढून राजयोगा मेडिटेशन शिकण्याचे आवाहन त्यांनी केले. सुप्रभा दीदी यांनी शहरात सुरु असलेल्या सेंटरच्या माध्यमातून मेडिटेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.


विखे पाटील हॉस्पिटलचे प्रा. डॉ. नायकवाडी यांनी, ते स्वतः ब्रह्माकुमारीचे सदस्य असून नियमित मेडिटेशन करतात आणि त्याचा उपयोग रुग्णांच्या उपचारात केला असल्याचे सांगितले. त्यांनीही उपस्थितांना मेडिटेशन कोर्ससाठी विद्यालयात येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सुवर्णा दीदी यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी निर्मला दीदी यांनी मानले. यावेळी नगरमधील अनेक नामांकित डॉक्टर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *