शहरात दक्षिणेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नसल्याचा इशारा
रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांना वेगळा विचार करण्याचे वेळ आणू नये -सुनिल साळवे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी ना. रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने दक्षिणेतील पदाधिकाऱ्यांनी शहरात बैठक घेवून त्यांची तातडीने उमेदवारी जाहीर होण्यासाठी तीव्र भावना व्यक्त केल्या. तर 2010 पासून महायुतीबरोबर असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले) सत्तेत वाटा देण्यासाठी शिर्डी व सोलापूरची जागा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या दोन्ही जागेवर विचार न झाल्यास रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी वेगळा विचार करणार असल्याचा इशारा देवून दबावतंत्राचा वापर रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरु केला आहे.
स्टेट बँक चौकातील एका हॉटेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, युवक जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे, युवक तालुकाध्यक्ष जयराम आंग्रे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश त्रिभुवन, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, शहर जिल्हाध्यक्ष माया जाधव, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, सारिका गांगुर्डे, युवराज गायकवाड, शिवाजी शिरोळे, बापू जावळे, लोकेश बर्वे, गणेश कदम, विजयकुमार ठोंबे, सिद्धांत दाभाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील साळवे म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप बरोबर दहा वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. भाजपने सत्तेत 10 टक्के वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रात पक्षाचे राष्ट्रीय नेते आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले, मात्र ते वगळता केंद्रात अथवा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. या लोकसभेत पक्षाच्या वतीने शिर्डीसाठी रामदास आठवले व सोलापूरसाठी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांची उमेदवारीची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापि या दोन जागेसाठी महायुतीकडून निर्णय होत नसल्याने रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप व मित्र पक्षांनी युतीचा धर्म पाळवा, फक्त निवडणुकीपुरते वापर करुन घेवू नये. या दोन्ही जागांसाठी राज्यातील आंबेडकरी अनुयायी गंभीर असून, दोन्ही जागा महायुतीचा धर्म पाळून रिपाईला द्याव्या. या दोन्ही जागेचा विचार न झाल्यास रिपाई व आंबेडकर जनता महायुती सोबत राहणार नाही. आरपीआयला डावण्यात आल्यास याचा परिणाम इतर मतदार संघावर होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
किरण दाभाडे म्हणाले की, महाराष्ट्रात पाच जागा राखीव आहेत. रिपाईने फक्त दोन जागेची मागणी केली आहे. सत्तेत भागीदारी वाटा मिळावा, अन्यथा वेगळा निर्णय घेण्याची वेळ भाजपने आणू नये असे त्यांनी सांगितले. संजय कांबळे म्हणाले की, शिर्डीत आठवले यांची उमेदवारी जाहीर करावी यासाठी दक्षिण मतदार संघातही आंबेडकर अनुयायीच्या भावना तीव्र आहेत. शिर्डी व नगर दोन्ही मतदार संघात आंबेडकरी अनुयायींची मते निर्णायक ठरणारी आहेत. तर इतर मतदार संघात ही मते मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजय भांबळ म्हणाले की, आठवले यांची उमेदवारी आंबेडकरी अनुयायीच्या दृष्टीकोनाने अस्मितेचा विषय बनला आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत डावलून चालणार नाही, यामुळे संपूर्ण समाजाच्या रोषाला महायुतीला सामोरे जावे लागेल. त्यांची उमेदवारी नाकारणे म्हणजे आंबेडकरी समाजाचा घात करण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. आरती बडेकर यांनी महिलांच्या व विवेक भिंगारदिवे यांनी युवकांच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या.