फुले दांम्पत्यांनी समाजातील विषमता आणि अनिष्ट प्रथा दूर होण्यासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली -पै. नाना डोंगरे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
नवनाथ विद्यालयात झालेल्या जयंती कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तृप्ती जाधव, राम जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मयुरी जाधव, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त मंदाताई डोंगरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, महात्मा फुले यांनी समतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. फुले दांम्पत्यांनी समाजातील विषमता आणि अनिष्ट प्रथा दूर होण्यासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. कुटुंबाचा उद्धार पुरूषांपेक्षा महिला करू शकतात, हा दूरदृष्टीकोन ठेऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी क्रांती घडवली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत केल्याचे स्पष्ट करुन त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर भाषणे सादर केली. या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.
