• Wed. Jul 23rd, 2025

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फिनिक्सचे नेत्र तपासणी शिबिर

ByMirror

Apr 10, 2024

मतदार जागृती अभियान राबवून ज्येष्ठांना मतदानाचे आवाहन; 76 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन सामाजिक प्रश्‍नांवर कार्य करण्याची गरज -चंद्रकांत खाडे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांनी तत्कालीन सामाजिक प्रश्‍न व वंचित घटकांसाठी कार्य केले. तर वंचितांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी योगदान दिले. त्यांचा आदर्श ठेऊन आजच्या सामाजिक प्रश्‍नांवर कार्य करण्याची गरज असल्याची भावना नागरदेवळे ग्रामपंचायतचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी व्यक्त केली.


फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी खाडे बोलत होते. यावेळी उद्योजक राजेंद्र सोनावणे, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, भाऊ कर्डिले, बुधराणी हॉस्पिटलचे प्रकल्प समन्वयक धर्माधिकारी, विठ्ठल राहींज, रोहित धाडगे आदी उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टीदोष दूर करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते. महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, या शिबीराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरविण्यात येत आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.


गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 367 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 76 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. या रुग्णांची पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे.

प्रारंभी मतदार जागृती अभियान राबवून ज्येष्ठ नागरिक व महिलांना मतदानाचे महत्त्व विशद करुन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी गरजूंना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिकांची उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *