• Tue. Oct 14th, 2025

निमगाव वाघा ग्रामपंचायतीत महात्मा गांधीजी-शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

ByMirror

Oct 2, 2025

महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन


महापुरुषांचे विचाराने समाजात खरी क्रांती घडणार -पै.नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधीजी, लालबहादूर शास्त्री आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी उपसरपंच प्रमोद जाधव, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, संदिप येणारे, सौरभ कापसे, सोमनाथ आतकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह युवक-युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सरपंच उज्वलाताई कापसे म्हणाल्या की, महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचा जो मार्ग दाखवला, तो आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, हेच खरे राष्ट्रसेवा आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान हा संदेश देऊन भारताची ताकद शेतकरी आणि सैनिकांमध्ये असल्याचे अधोरेखित केले. तसेच आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचे त्यांनी आवाहन केले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, महात्मा गांधीजी, लालबहादूर शास्त्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताची मुहुर्तमेढ रोवली. गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले, शास्त्रीजींनी देशाला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला, तर आंबेडकरांनी समाजाला न्याय, समानता आणि शिक्षणाचे शस्त्र दिले. त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला, तरच खरी आदरांजली ठरेल. या महापुरुषांचे विचार आचरणात आणले तर समाजात खरी क्रांती घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *