राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत निमगाव वाघात रंगणार कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक माधवराव लामखडे यांची नियुक्ती करण्यात आली. नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी लामखडे यांच्या अध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर करुन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरणाच्या प्रश्नांचा जागर केला जाणार असून, युवा सप्ताहानिमित्त तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन होणार आहे.
पहिल्या सत्रात उद्घाटन व सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रज्ञावंतांना स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार व राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
सातत्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमास लामखडे यांचे सहकार्य लाभत असल्याने त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे डोंगरे यांनी सांगितले. नियुक्ती जाहीर झाल्याबद्दल काव्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत पालवे, मुख्यध्यापिका अनिता काळे, शबनम डफेदार, प्राचार्य गुंफाताई कोकाटे, कवी रज्जाक शेख, देवीदास बुधवंत, साहेबराव बोडखे, आनंदा साळवे, विक्रम अवचिते, गिताराम नरवडे, कवियत्री जयश्री सोनवणे, मिराबक्ष शेख आदींनी अभिनंदन केले.