• Mon. Mar 2nd, 2026

केडगावच्या चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त अवतरले चिमुकले सांताक्लॉज

ByMirror

Dec 23, 2024

जेएसएस गुरुकुलने विद्यार्थ्यांना घडवली चर्चची सहल

मुलांमध्ये संस्कार व धार्मिक ऐक्याची रुजवण होण्यासाठी राबविला उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- शिक्षणासह संस्काराचे धडे देणाऱ्या केडगाव, मोहिनी नगर येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूल पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये सहल घडविण्यात आली. भूषण नगर येथील चर्च ऑफ द नॅझरीन मध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेत चिमुकले दाखल झाले होते. संपूर्ण चर्च चिमुकल्या सांताक्लॉजने बहरले होते.


जेएसएस गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक व सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी विविध धर्माच्या सण-उत्सवात मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आदी विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याचे उपक्रम सातत्याने सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर स्कूलचे प्राचार्यआनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी योगिता पाठक, प्रियांका भोंग, श्रुती पालखे, अर्चना शिरसाठ, आनिशा जाधव, बिना आरवडे, आरती राऊत, अनुपमा तोडमल आदींसह शिक्षक व पालक उपस्थित होते.


आनंद कटारिया म्हणाले की, भविष्यातील पिढी घडविण्यासाठी मुलांमध्ये संस्कार व धार्मिक ऐक्याची रुजवण होणे आवश्‍यक आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना विविध धर्माच्या सण-उत्सव काळात त्याचे धर्माची माहिती व शिकवण देखील सांगितली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


चर्चमध्ये रेव्ह. अद्वैत खेडदुगेकर यांनी विद्यार्थ्यांना ख्रिश्‍चन धर्म, प्रभू येशूंचा जन्म व सांताक्लॉजची माहिती दिली. मुलांच्या उपस्थितीमध्ये देशाच्या सुख, शांती व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली. पालकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करुन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *