सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेहाबद्दल जागृती
लायन्स मिडटाऊन व शहर सहकारी बँकेचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुमेह अनुवंशिक आजार असला तरी, चुकीच्या आहार-विहार पद्धतीमुळे तो झपाट्याने वाढत आहे. लवकरच भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणार आहे. हा आजार सायलंट किलर असून, संपूर्ण शरीराला आतून पोखरत असतो. आहारातील चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैलीने मधुमेह आजार जडत असल्याचे प्रतिपादन होमिओपॅथी तज्ञ डॉ. कल्पना ठुबे यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व शहर सहकारी बँकेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी आयुष्याचे रहस्य या कार्यक्रमात मधुमेह आजारावर मार्गदर्शन करताना डॉ. ठुबे बोलत होत्या. शहर बँकेच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लबचे विभाग अध्यक्ष हरिश हरवानी, लायन्स मिडटाऊनचे अध्यक्ष प्रसाद मांढरे, सचिव संदिपसिंह चौहान, डॉ. कल्पना ठुबे, प्रकल्प प्रमुख सुनंदा तांबे, नंदकुमार राऊत, शोभा भालसिंग, विकास बडे, प्रतिभा बडे, शहर बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी तन्वीर खान, के.डी. देशमुख, माधवी मांढरे, लतिका पवार, शांता ठुबे, अरुण टिपरे, मीरा पडवळ, विनायक ढोकेळकर, अरुण टिपरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. ठुबे म्हणाल्या की, पित्त प्रकृती असलेल्यांना मधुमेहाचा अधिक धोका असतो. आहार, विहार, योग-प्राणायामने यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. योग्य जीवनशैलीने निरोगी जीवन जगता येते. स्वत:ला व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे व सकस अन्न पदार्थाचा दैनंदिन आहारात समावेश असला पाहिजे. मधुमेह रुग्णांनी सकाळी नाष्टा केल्याशिवाय बाहेर पडू नये. याचबरोबर मधुमेहाचे प्रकार व त्यावरील नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली उपचार पद्धतीवर त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रसाद मांढरे म्हणाले की, मागील तीस वर्षापासून सेवाभावाने लायन्स मिडटाऊन योगदान देत आहे. सामाजिक उपक्रमाबरोबर आरोग्य क्षेत्रातही कार्य सुरू आहे. सर्वसामान्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व त्याची जागृती करुन मोफत आरोग्य आरोग्य शिबिरे घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. या वर्षात देखील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध तपासणी शिबिर घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी शहर सहकारी बँकेचे दिवंगत कर्मचारी मधुकर तांबे, संजय मुळे व राजेंद्र पाटोळे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात नंदकुमार राऊत यांनी उतार वयात आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन व्यतीत करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आरोग्याबद्दल जागृती व मधुमेहावर मात करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले गेल्याचे सांगितले. डॉ. सुदर्शन गोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना दातांची काळजी कशी घ्यावी? याबद्दल मार्गदर्शन करुन दंत विकारावर अद्यावत उपचार पध्दतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास बडे यांनी केले. आभार संदिपसिंह चौहान यांनी मानले.