दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
विरोधकांना विकास कामे खपत नाही
अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधकांना विकास कामे खपत नसल्याने, प्रभागात करण्यात आलेल्या चांगल्या कामांच्या देखील तक्रारी करण्यात आल्या. मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे व विकास कामांना प्राधान्य देऊन कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
शहरातील संजय नगर, काटवन खंडोबा येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली असताना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून तर नगरसेवक अनिल शिंदे व दत्ता गाडळकर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे माजी अध्यक्ष सुनील साखरे, आशिड (मुन्ना) शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, दयाबाई गायकवाड, आशाबाई काळोखे, रेखा आल्हाट, नागेश खुरपे, अनिल बेद्रे, राजेश बिडवई, वैजनाथ लोखंडे, दुर्गा घाडगे, दिलीप तोडकर, शिवाजी जावळे, विशाल कांबळे, रमेश शिंदे, शंकर पंडित, विजय काळोखे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पुढे शिंदे म्हणाले की, संजय नगर, काटवन खंडोबा परिसरात दर्जेदार काम सुरू आहे. महात्मा ज्योतिबा फुले वसाहत येथे ड्रेनेज लाईन, रस्त्याचे काँक्रिटीकरण व पाण्याचा प्रश्न देखील सोडविण्यात आला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 2.5 कोटी रुपये निधी प्रभागासाठी दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी 4 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. वर्षभर विकास कामे सुरू राहणार असून, उत्कृष्ट कामातून प्रभागाचा कायापालट होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दत्ता गाडळकर म्हणाले की, सर्वसामान्यांची प्रश्न सुटावीत या भावनेने विकास कामे मार्गी लावण्यात येत आहे. नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून राजकारण न करता फक्त विकासाच्या अजेंड्यावर कार्य सुरु आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था होती. नागरिकांना पावसाळ्यात दफनभूमीकडे जाता देखील येत नसल्याने हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील साखरे म्हणाले की, समाजातील दफनभूमीच्या रस्त्याचा ज्वलंत प्रश्न सुटला आहे. समाज देखील हा महत्त्वाचा प्रश्न सोडविणाऱ्यांच्या हाकेला ओ देणार आहे. दफनभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण होती. अंत्यविधीसाठी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याने समाजबांधव व स्थानिक नागरिकांची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल समाजाच्या वतीने नगरसेवक अनिल शिंदे व दत्ता गाडळकर यांचा सत्कार करण्यात आला.
