पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष; भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष
पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामवाडी परिसरातून रविवारी (दि.4 ऑगस्ट) शोभायात्रा काढण्यात आली.

यामध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात पोतराजसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उंट, कलशधारी महिला, पोतराज व घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मीमातेच्या मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी लक्ष्मीमातेचा जयघोष केला.
या यात्रेला 50 वर्षाची परंपरा असून, दरवर्षी लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. युवकांनी प्रवरा संगम येथून कावडीने आणलेल्या जलने रामवाडी येथील लक्ष्मी मातेच्या मुर्तीला अभिषेक घालण्यात आला. विधीवत पूजा करुन लक्ष्मी मातेची उत्सवमुर्तीची मिरवणुक शहरातून काढण्यात आली. संबळ, हलगी, ढोल व ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वत:वर आसूडचे फटके ओढले. आसूड ओढताना चट्ट…चट्ट… हा एकच आवाज परिसरात घुमला.

या यात्रेनिमित्त माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे वर्षातून एकदा पोतराजचा साज चढवून देवीला अभिवादन करतात. तर यावेळी पोतराज म्हणून बबन लोखंडे, लखन लोखंडे, अशोक क्षीरसागर, इंद्रभान खुडे, ऋतिका क्षीरसागर सहभागी झाले होते. पारंपारिक वाजंत्रीत भाऊ चांदणे, महेश चांदणे, अनिल नेटके यांचा समावेश होता.
भाविकांसह युवकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. पारंपारिक वाद्यांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला. या शोभायात्रेत परिसरातील महिला डोक्यावर कलश, कपाळी गंध लाऊन तर भाविक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. ही शोभायात्रा कोठला, मंगलगेट, सर्जेपूरा, रंगभवन येथून मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे तिचा समारोप झाला. शनिवारी (दि.3 ऑगस्ट) रामवाडीत यात्रेनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती विकास उडानशिवे यांनी दिली.