• Wed. Oct 29th, 2025

पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने नॅनो धनराई चळवळीचा प्रारंभ

ByMirror

May 2, 2024

वाढते तापमान व ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी घरोघरी धनराई उभारण्याचा आग्रह

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढते तापमान व ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी (दि.1 मे) माझ्या अंगणात नॅनो धनराई चळवळीचा प्रारंभ करण्यात आला. सावेडी, धर्माधिकारी मळा येथे या अभियानाचा प्रारंभ घराभोवती लावण्यात आलेल्या फळझाडे, रोपे, वृक्ष व वेलींना पाणी देऊन करण्यात आला.


यावेळी ॲड. कारभारी गवळी, वसुधा शिंदे, संध्या पवार, ताराबाई तांबे, सुनिता गवळी, ललिता गवळी, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, शिल्पा कुलथे, भगवंतराव तांबे, ताराबाई तांबे, संदीप पवार, आयुष गवळी, आरोही मुसळे, पूर्वी गवळी, मिनल कुलथे, लावण्य कुलथे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, निसर्गाचा समतोल बिघडत असताना पर्यावरण संवर्धनासाठी सामुदायिक प्रयत्न होत नसल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात मध्य महाराष्ट्रात तापमान 45 डिग्री च्या वर गेले. तर दुबई आणि मुंबईचा काही भाग सुद्धा समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा तज्ञांनी अंदाज जाहीर केला आहे. मानव जातीच्या पुढील पिढ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धन होण्याची गरज आहे. ज्या लोकांची घर आहेत आणि अंगणासाठी काही जागा उपलब्ध आहे; अशा जागेत किचन गार्डनच्या ऐवजी नॅनो धनराई उभारण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रकाश थोरात म्हणाले की, पाश्‍चात्य कुटुंबाकडे प्रत्येक घराभोवती झाडे, उद्यान व होम जिम असते. परंतु भारतीय समाजात झाडे लावण्याबाबत आणि व्यायामासाठी उदासीनता आढळून येते. भारतीयांनी आपली जीवन पद्धती बदलली आहे. त्यामुळे सायलेंट किलर प्रत्येक घराघरात पोहचलेला आहे. अनेक लोक कॅन्सर, दमा, ब्लड प्रेशर, मधुमेह इत्यादी आजाराने त्रस्त आहेत. धनराई याचा अर्थ फक्त पैशाच्या स्वरूपात काही मिळावे अशी अपेक्षा नसून, भारतीयांचे आरोग्य हीच मोठी संपत्ती आणि देशाचे भविष्य ठरणार आहे. नवीन पिढीची सुदृढ उभारणी करण्यासाठी नॅनो धनराई उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिल्पा कुलथे यांनी भविष्यात मुला-बाळांसाठी मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार करुन निसर्गाची धनराई कमविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


नॅनो धनराई चळवळीच्या माध्यमातून नारळाचे एक झाड, केशर आंब्याचे एक झाड, शेवगा, एक औषधी वनस्पती, त्याशिवाय कढीपत्ता, फळझाडे, फुलझाडे आणि अनेक वेली त्याशिवाय लहान मुलांना खेळण्यासाठी अंगण आणि थोर मोठ्यांसाठी योग-व्यायाम करण्याची व्यवस्था इत्यादी सर्व बाबी या नॅनो धनराईत समाविष्ट आहे. या धनराईच्या कोपऱ्यामध्ये डबलबार, सिंगलबारचा प्रस्ताव देखील संघटनेने जारी केलेला आहे. शेतकऱ्यांनी एकात्मिक धनराईचा अवलंब केला पाहिजे; परंतु स्वतःच्या घराभोवती स्वतःची बाग असावी आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंदी जीवन जगण्याची संधी सर्वांना मिळण्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *