• Tue. Jan 13th, 2026

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात गणित, विज्ञान प्रदर्शन उत्साहात

ByMirror

Oct 27, 2023

विविध प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी उलगडले विज्ञान, पर्यावरण व गणिताचे कोडे

सक्षम समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज -छाया काकडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होवून विज्ञान, पर्यावरण व गणिताची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत गणित, विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या उपक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विज्ञान, पर्यावरण व गणित विषयावर विविध प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते.


या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक व दैनंदिन जीवनोपयोगातील विविध उपकरणे तयार करण्याचा अनुभव घेतला. तर अंधश्रध्देला थारा न देता वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पातून दिला. या गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे व प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या हस्ते झाले. प्रारंभी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदर्शन समिती प्रमुख सुनिता लांडगे, सदाशिव पगारे, भिमाबाई घोडे, ग्रंथालय प्रमुख सुप्रिया निमसे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


छाया काकडे म्हणाल्या की, नवनवीन प्रयोगाने चिकित्सक वृत्ती वाढीस लागते. विज्ञानाची कास धरल्यास त्यातून समाजाची प्रगती होणार आहे. सक्षम समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धीला व कला-गुणांना वाव देण्यासाठी गणित, विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे ठरते. भविष्यातील नवनवीन प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.


इयत्ता 5 वी ते 10 वी मधील दोन्ही गटांतून विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली जवळजवळ 120 उपकरणे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांना विद्यालयातील ग्रंथालयात असणाऱ्या पुस्तकांची ओळख व्हावी, वाचनाची प्रेरणा मिळून आवड निर्माण होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे परीक्षण उपशिक्षिका प्रिया खेंडके, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे यांनी केले.


गणित प्रदर्शन लहान गट प्रथम- पार्थ घोडे, मोठा गट प्रथम- मयुर पवार व विज्ञान प्रदर्शन लहान गट प्रथम- मिताली खेंडके, मोठा गट प्रथम- मदिहा काझी, यांच्यासह द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *