अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथील निवृत्त जेष्ठ क्रीडाशिक्षक गणपत रामराव सानप यांचे मंगळवारी (दि.29 सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले.
गणपतराव सानप हे अतिशय मनमिळावू व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. ते राष्ट्रसेवा दलातील एक उत्कृष्ट खेळाडू होते. ॲथलेटिक्स, मल्लखांब, कुस्ती या क्रीडा प्रकारात त्यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या व बक्षिसे मिळविली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडले. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा कांबळे, अंजली देवकर, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, सारडा कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे, सायकलिंगचे राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता नलावडे असे अनेक राष्ट्रीय खेळाडूंना त्यांनी घडविण्यात मोलाचे मार्गदर्शन होते.
नेवासा तालुक्यातील माका येथील त्यांचे मुळ गाव असून, प्रगतिशील शेतकरी किसनराव सानप यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. महाराष्ट्र क्रीडा शिक्षक महासंघाचे खजिनदार क्रीडा शिक्षक घनश्याम सानप व समर्थ विद्यालय याच्या मराठीच्या शिक्षिका श्रद्धा नागरगोजे व पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी निंभोरे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल क्रीडाक्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे.