जातीय द्वेषातून गटारीचे पाणी खासगी जागेत सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून खानापूर (ता. शेवगाव) येथील बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कार्यवाहीचे लेखी दिलेले असताना देखील रस्ता खुला होण्यासाठी कार्यवाही होत नसल्याने व खासगी प्लॉट मध्ये जातीय द्वेषातून ग्रामसेवक व सरपंच यांनी गावातील गटारीचे पाणी सोडल्याचा आरोप करुन त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी आपल्या कुटुंबीयांसह शेवगाव तहसिल कार्यालया समोर उपोषण केले.
सदर रस्ता खुला केला जात नसल्याने गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. गायकवाड यांचा खानापूर गावात 139 व 140 नंबरचा प्लॉट आहे. या प्लॉट मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर चर खोदून व काटे टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने गायकवाड यांना स्वत:च्या जागेत जाता येत नाही. हा रस्ता अतिक्रमण करुन बंद करणाऱ्यांनी चोरला असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. तर जातीय द्वेषातून ग्रामसेवक व सरपंच यांनी सदरील प्लॉटमध्ये गावाच्या गटारीचे घाण पाणी सोडण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर रस्ता अडविणाऱ्यांवर कारवाई करावी व खासगी प्लॉटमध्ये गटारीचे घाण पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी 139 व 140 प्लॉटच्या आतील बाजूस रस्ता असून, सांडपाणी बाबत वित्त आयोगाच्या आराखड्यात याचा समावेश करण्यात येणार आहे.
तसेच प्लॉट मधील सांडपाणी बाबत पुढील वित्त आयोगातील निधीमधून गावातील उर्वरित सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे नियोजन करण्यात येणार आल्याचे ग्रामपंचायतने कळविल्याचे लेखी पत्रात म्हंटले आहे. तर गावाचा नकाशा व रस्त्याबाबत प्रत्यक्ष पहाणी करून पंधरा दिवसात अपेक्षित कार्यवाही करण्याचे आश्वासन 14 ऑगस्ट रोजी देण्यात आले होते. मात्र या लेखी पत्रानंतर देखील कारवाई झाली नसल्याने गायकवाड कुटुंबीयांनी उपोषण सुरु केले आहे.