रविवारी रंगणार श्री साईबाबा पालखी सोहळा
साईभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील बँक कॉलनीत श्री साईबाबा फाऊंडेशनच्या वतीने साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याला प्रारंभ झाले आहे. साईबाबा मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
पारायण सोहळ्याची सुरुवात उद्योजक दिलीप नागरे यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाली. रविवारी (दि.3 सप्टेंबर) रोजी दुपारी 2 वाजता श्री साईबाबा पालखी सोहळा रंगणार आहे. तर सोमवारी (दि.4 सप्टेंबर) रोजी काकडा आरती व सकाळी 9.30 वाजता शिर्डी येथील माधुरीताई शिंदे यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी 12 वाजता उद्योजक सचिन भानुदास कोतकर यांच्या हस्ते मध्यान्ह आरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात साईभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कतोरे यांनी केले आहे.