रक्तदान शिबिरासह महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनात कवियत्री प्रतिभा खैरनार यांच्या पडसावल्या काव्य संग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे. तर यावेळी रक्तदान शिबिर व महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.

नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 14 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये निसर्ग आणि प्रेम अनुभवाची नितळ जाणीव करुन देणाऱ्या व नातेसंबंधांच्या अदृश्य तळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या कवियत्री प्रतिभा खैरनार यांच्या काव्य संग्रहाचे प्रकाशन काव्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, ज्येष्ठ कवि चंद्रकांत पालवे, उद्योजक बाळासाहेब शहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
कवियत्री खैरनार यांनी पडसावल्या काव्य संग्रहातून स्त्री मनाचे उत्कट भाव संवेदना मांडल्या आहेत. बापाचे कष्टप्रद जगणे अंसो की, आईच्या मनावकाशात रंगणाऱ्या लेकीचे सासरी जाणे असो अशा अनेक मानसिक अनुभवांनी हे काव्य संग्रह फुललेले आहे.
काव्य संमेलनात रक्तदान शिबिर जनकल्याण रक्त केंद्राच्या सहकार्याने संपन्न होणार असून, या शिबिरात युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
