कर्मवीरांचा त्यागमय आदर्शच शिक्षणातील प्रश्न सोडवू शकतो -डॉ. कुंडलिकराव शिंदे
कार्यक्रमातून कर्मवीरांच्या विचारांचा जागर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्मवीर भाऊरावांनी उभ्या केलेल्या शिक्षण व्यवस्थेने आज बहुजन समाज सावरला आहे. पूर्वी कोणत्याही सोयी-सुविधा नसताना कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. मात्र सध्या सोयी-सुविधा असताना देखील शिक्षण क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कर्मवीरांच्या त्यागमय वृत्तीने शिक्षण क्षेत्रात कार्य केल्यास ते प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. कुंडलिकराव शिंदे यांनी केले.

कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि.25 सप्टेंबर) पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शिंदे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, स्कूल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर, विश्वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मीताई आहेर, श्यामराव व्यवहारे, शरद गावडे, ज्योतीताई मोकळ, लक्ष्मण ठाणगे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, कर्मवीर अण्णांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांनी प्रेरित होऊन शेतकरी, कामगार, गरीब, अस्पृश्य, दुर्लक्षित यांच्यासाठी आयुष्य वाहून घेतले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे शस्त्र आहे. या जाणिवेतून त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेमुळे ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, ही जाणीव ठेऊन त्यांनी केलेले कार्य परिवर्तनाची नांदी ठरली असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी शाळेतील वडाच्या झाडाखाली असलेल्या डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लेझीम व वाद्यवृंद पथकाने प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी रांगोळी स्पर्धेनिमित्त विद्यार्थिनींनी विविध सामाजिक विषयांवर रेखाटलेल्या रांगोळी दालनाचे व अटल टिंकरिंग लॅब प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध इलेक्ट्रॉनिक व ए आय मॉडेल प्रदर्शनात ठेवले होते.
प्रास्ताविकात छायाताई काकडे यांनी संपूर्ण राज्यात रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी होत असल्याचे सांगितले. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाने जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखविला. शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची गरज नाही तर जिद्द ठेवण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
अभिषेक कळमकर म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्थेचा मान रयत शिक्षण संस्थेला आहे. या संस्थेला 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही संस्था फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतात शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरली आहे. कर्मवीर अण्णांनी या शाखा समाजातील शेवटच्या घटकांना शिक्षण मिळण्यासाठी सुरु केल्या. अण्णांचा हा विचार आजही तितकाच या संस्थेच्या माध्यमातून जिवंत आहे. कारण समाजात शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.
अर्जुनराव पोकळे म्हणाले की, कर्मवीरांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची मुले घडवली. शिक्षणाची संधी उपलब्ध करुन ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली असल्याचे सांगून, जीवनात उंच ध्येय ठेवून वाटचाल करण्याचे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप पालवे व स्मिता पिसाळ यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व सेवकांचे सहकार्य लाभले.