युवकांना आरोग्य, व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शनवर व्याख्यान
खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते -ज्ञानेश्वर खुरांगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीन विकास खुंटला आहे. जीवनात व मैदानात घाम गाळल्याशिवाय यश मिळणार नाही. आयुष्यातील कुठल्याही परीक्षेत यश मिळविण्यासाठी शॉर्टकट नसतो. मनात ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास ध्येयप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केले.

मोटीव मार्शल आर्टस स्पोर्टस ॲण्ड सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने शालेय विद्यार्थी व युवकांसाठी कराटे प्रशिक्षण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कराटे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या व विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंच्या गौरव सोहळ्याप्रसंगी खुरांगे बोलत होते.

शहरातील हॉटेल सिंग रेसीडेन्सीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पुणे येथील पायलट ट्रेनिंग अकॅडमीचे संचालक कॅप्टन अभिषेक, प्रहार अकॅडमीचे संचालक विनोद परदेशी, हॉटेल व्यवसायिक युवराज नहार, पुणे येथील आर्किटेक्ट अहमद चौधरी, ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष गौस शेख, हाजी समीर शेख, आलमगीर मदरसेचे प्राचार्य रियाज अहमद शेख आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौस शेख म्हणाले की, कराटे खेळातून शारीरिक व्यायाम होऊन स्वसंरक्षणाचे धडे देखील मिळतात. शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्त्व आले आहे. अनेक मुला-मुलींनी खेळातून आपले करियर घडविले आहे. मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने, स्वसंरक्षणासाठी व शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांना कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विनोद परदेशी म्हणाले की, खेळाने व्यक्तीमत्व विकास होवून, शारीरिक व मानसिक जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मैदानी खेळाची गरज आहे. धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मदरसातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांच्यासाठी निशुल्क कराटे प्रशिक्षण राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना यावेळी युवकांना आरोग्य, व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शनवर व्याख्यान देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रीत करुन ध्येय कसे साध्य करावे? यावर मार्गदर्शन करण्यात आले. कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत उत्तीर्ण झालेले खेळाडू, प्रशिक्षणार्थी खेळाडू व विविध स्पर्धेत मेडल मिळवणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्शिद सय्यद, मुख्तार सय्यद, अमीर शेख, जैद बागवान, सचिन कोतकर, अल्ताफ खान, सुरजित सिंग यांचे सहकार्य लाभले.