विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचा उपक्रम
पुस्तक हेच खरे ज्ञानाचे भांडार -गणेश बनकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने कामरगाव (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या वाचनालयासाठी विविध विषयांवरील पुस्तकांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी, त्यांच्यात सकारात्मक विचारसरणी वाढीस लागावी आणि जीवनाला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी शालेय शिक्षकांकडे पुस्तके सुपूर्द केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष हेमंत साठे यांच्यासह शालेय शिक्षिका बेबी ढेले, सविता तवले आदींसह शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी महापुरुषांची चरित्रे, महान व्यक्तींच्या आत्मकथा, यशस्वी व्यक्तींच्या जीवनप्रवासावरील पुस्तके तसेच विविध शैक्षणिक व ज्ञानवर्धक साहित्य वाचनालयासाठी देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच वाचनाची गोडी लागून त्यांच्या विचारविश्वाचा विस्तार होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
गणेश बनकर म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात मुलांचा कल मोबाईल आणि इंटरनेटच्या दिशेने अधिक आहे. मात्र पुस्तक हेच खरे ज्ञानाचे भांडार आहे. विद्यार्थ्यांनी चांगली पुस्तके वाचली तर त्यांच्यात विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
हेमंत साठे म्हणाले की, भाजप ओबीसी मोर्चाने आमच्या शाळेच्या वाचनालयासाठी दिलेली पुस्तके ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठेवा आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व प्रेरणादायी साहित्य सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी या पुस्तकांमुळे त्यांना नवे विचार, नवी प्रेरणा आणि यशस्वी जीवनाची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
