• Sun. Jul 20th, 2025

ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे -महादेव जानकर

ByMirror

Feb 3, 2024

रासपचे महादेव जानकर यांची शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लहामगे यांच्या निवासस्थानी भेट

विविध सामाजिक विषयांवर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे, हीच सर्व पक्षाची भूमिका होती. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सरकार सांगत असले तरी त्यातूनच आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून, ओबीसींच्या हक्कावर गदा येता कामा नये, यासाठी हा जनजागृती महाएल्गार मेळावा होत असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.


ओबीसी महाएल्गार मेळाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री जानकर यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जानकर बोलत होते. प्रारंभी लहामगे यांनी जानकर यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी रासपचे प्रदेश सचिव राजेंद्र कोठारी, माजी नगरसेवक काका शेळके, बाळासाहेब गायकवाड, अनिल निकम, हरिभाऊ डोळसे, सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते.


पुढे जानकर म्हणाले की, छोट्या छोट्या अनेक जाती आहेत, त्यांची स्वातंत्र्याची पहाट उगवली नाही. मराठा समाज आमचा शत्रू नसून, त्यांना स्वतंत्र्य विशेष आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका होती. सरकार त्यांना बळी पडत असेल, तर ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्यातून ओबीसीमध्ये चैतन्य निर्माण होत आहे. समाजाचे खरे नेते कोण व खोटे नेते कोण? हे समोर येत आहे. तर शासन प्रशासनावर दबाव आणण्याचे काम केले जात आहे. जातनिहाय जनगणना झाली तर सर्व समाजाचा प्रश्‍न मिटणार, ही भूमिका ठेवून सातत्याने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली. गरीब समाजावर अन्याय होऊ नये, ही संविधानिक मागणी घेऊन लढा सुरू आहे. वंचितांच्या ताटात असलेली अर्धी भाकरी देखील ओरबडली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आनंद लहामगे म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जानकर यांची भेट ही सामाजिक विषयांवर होती. याला राजकीय स्वरूप नव्हते. ओबीसी समाजातील पुढील दिशा व विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *