• Fri. Sep 19th, 2025

कोतवालीच्या डीबी इंचार्जकडून पत्रकारास मारहाण

ByMirror

Sep 13, 2025

पत्रकारांना आरोपीप्रमाणे वागणुक तर सर्वसामान्यांचे काय?

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनचे डीबी इंचार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेने पत्रकार वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा निषेध नोंदवून पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन संबंधित पोलीस अधिकारीवर कारवाईची मागणी केली.


निवेदनात म्हटले आहे की, शब्बीर सय्यद हे रात्री घरी जात असताना कोतवाली पोलिसांची गाडी अतिवेगाने पोलीस ठाण्यात शिरली. काही गंभीर घटना घडली असावी असा संशय आल्याने सय्यद यांनी चौकशी केली. त्यावर अधिकारी गणेश देशमुख यांनी आक्रमक होत, तू मला विचारणारा कोण? असे अपमानास्पद शब्द उच्चारले. पत्रकार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी सय्यद यांना शिवीगाळ केली, कॉलर पकडून ठाणे अंमलदारासमोर मारहाण केली तसेच अपमानास्पद वागणूक दिली.


सय्यद यांनी विरोध केल्यावर देशमुख यांनी पुन्हा शिवीगाळ केली, ओळखपत्र मागवूनही नाकारले, मोबाईल हिसकावून घेतला व 353 कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मोबाईल व ओळखपत्र परत करतानाही अपमानास्पद शब्दांत धमकावत परत दिसल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे सय्यद यांनी सांगितले.


या घटनेचा निषेध व्यक्त करत पत्रकार शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार विठ्ठल लांडगे, सुभाष चिंधे, साहेबराव कोकणे, शब्बीर सय्यद, अण्णासाहेब नवथर, सूर्यकांत नेटके, आफताब शेख, बाबा ढाकणे, अजहर सय्यद, मुंतजीर शेख आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *