• Fri. Jan 9th, 2026

पत्रकारांनी केलेली पत्रकारिता पुस्तकरूपात मांडावी -सुधीर लंके

ByMirror

Jan 9, 2026

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दिन पत्रकारांच्या सन्मानाने साजरा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पत्रकारांनी पत्रकारिता करताना केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या अनुभवांचे व कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. पूर्वीचा आणि आजचा बदलता काळ, त्या-त्या काळात केलेली पत्रकारिता याचा अनुभव पुस्तकरूपाने समाजासमोर मांडावा. अशी पुस्तके नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले.


मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहरात मराठी पत्रकार दिन पत्रकारांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, नितीन पोटलाशेरु, रामदास ढमाले, महेश महाराज देशपांडे, सुदाम देशमुख, शिरीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, रमेश देशपांडे, दिलीप वाघमारे, राजकुमार कटारिया, सुभाष चिंधे, बंडू पवार, सचिन शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, राजू खरपुडे, वाजिद शेख, साजिद शेख, बाबा ढाकणे, संजय सावंत, अन्सर सय्यद, गुलाम कादर जहागीरदार, संजय पाठक, राजेंद्र येंडे, सुधीर पवार, जहीर सय्यद, निसार मास्टर, आदिल रियाज शेख, रमीज शेख, नवीद शेख आदींसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लंके पुढे म्हणाले की, पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा व संवादासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, डिजिटल मीडियाला आज विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाही टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोठे व्यासपीठ म्हणून डिजिटल मीडिया समाजासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे शासनानेही डिजिटल माध्यमांना विश्‍वासात घेतले पाहिजे. नवोदित पत्रकारांचे योग्य प्रबोधन व प्रशिक्षण दिल्यास ते सक्षम व दर्जेदार पत्रकारिता करू शकतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


शहरासह जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभलेला असून, सातत्याने विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय घडामोडी येथे घडत असतात. लोकशाहीचे रक्षण करणारा पत्रकारच खरा पत्रकार असतो, असे स्पष्ट करताना लंके यांनी शासनाच्या अधिस्वीकृतीसाठी असलेली नियमावली, त्याचे फायदे व त्याचा लाभ कसा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख म्हणाले की, पत्रकारांनी 150 वर्षांपूर्वीचे विषय आणि आजचे विषय यांची सांगड घालून पुढे जाण्याची गरज आहे. पत्रकारितेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सोपवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सध्या तरुण पिढी या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे येताना दिसत नाही. जे नवीन पत्रकार येत आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्‍यक असून, यासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. निवृत्तीच्या वाटेवर असलेले अनुभवी पत्रकार नवोदितांसाठी योगदान देण्यास तयार आहेत. पत्रकारितेमध्ये डॉक्युमेंटेशनचे महत्त्व अधोरेखित करत, संघटनांनी पुढाकार घेऊन हे काम करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.


विठ्ठल लांडगे यांनी शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके व सदस्य विजयसिंह होलम यांच्या कार्याचे कौतुक केले. सर्वसामान्य व ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी ग्राह्य कसे धरता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असून, जाचक अटी शिथिल करण्याचे कामही त्यांनी केल्याचे नमूद केले.


या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संजय सपकाळ व संजय चोपडा, तसेच फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी पत्रकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाराज देशपांडे यांनी केले, तर आभार आफताब शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *