स्वत:च्या कर्तृत्वाने डमाळे हिने महाराष्ट्राच्या संघापर्यंत मारलेली मजल प्रेरणादायी -शिवाजी कर्डिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- वयाच्या चौदाव्या वर्षी महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जितेश्री डमाळे हिचा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले व जय हिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी सत्कार करुन सन्मान केला. यावेळी शिवाजी गर्जे, विष्णू डमाळे आदी उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जितेश्री हिची पधरा वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे.
शिवाजी कर्डिले म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातून आलेली जितेश्री डमाळे हिने आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या संघापर्यंत मारलेली मजल प्रेरणादायी आहे. वडिल एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर असताना तिने आवड असलेल्या खेळात यश गाठले आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज असलेली ही मुलगी भविष्यात भारताच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची आशा व्यक्त करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवाजी पालवे म्हणाले की, ग्रामीण भागातील युवती जिद्द व चिकाटीने आपले ध्येय गाठू शकते, हे जितेश्री ने आपल्या खेळातून दाखवून दिले आहे. तिचे यश मुलींसाठी प्रेरणादायी असून, ती अत्यंत कमी वयात महाराष्ट्राच्या संघात खेळणारी जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.