• Thu. Oct 16th, 2025

जन शिक्षण संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींना प्रमाणपत्राचे वितरण

ByMirror

Aug 26, 2023

उद्योग-व्यवसायातील मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन करुन शासकीय योजनांची दिली माहिती

महिलांना नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायात मोठ्या संधी – बालाजी बिराजदार

आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला चिकाटी व जिद्दीने उद्योग, व्यवसायात आपले कर्तृत्व निर्माण करत आहे. महिलांना नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग-व्यवसायात अडचणी येतात, त्यावर मात करून पुढे गेल्यास यश निश्‍चित असल्याचे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर बालाजी बिराजदार यांनी केले.


महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जन शिक्षण संस्थेत क्षमता बांधणी कार्यशाळातंर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. पाईपलाइन रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बिराजदार बोलत होते. यावेळी जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, जिल्हा उद्योग केंद्राचे आप्पासाहेब बडे, ज्ञानेश्‍वर खेडकर, अभिजीत आदीसह प्रशिक्षणार्थी युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे बिराजदार म्हणाले की, परिपूर्ण माहिती घेऊन महिलांनी उद्योग, व्यवसायात उतरावे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असून, त्याचा लाभ घेतल्यास मोठा आधार मिळणार आहे. उत्पादन उद्योग व सेवा उद्योग याची सविस्तर माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा व समाजातील गरजा ओळखून सेवा दिल्यास तो उद्योग, व्यवसाय बहरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत असल्याबद्दल जन शिक्षण संस्थेचे त्यांनी कौतुक केले.


बाळासाहेब पवार म्हणाले की, युवतींनी शिक्षण घेऊन घरात बसू नये, स्वत:मध्ये असलेल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व स्वत:चे कर्तृत्व सिध्द करण्यासाठी उंबरठा ओलांडावा. आई-वडिलांनी घरी बसण्यासाठी मुलींनी शिक्षण दिले नसून, सावित्रीच्या लेकींना कर्तृत्व सिध्द भरारी घ्यावी. या पंखाना बळ देण्याचे कार्य जन शिक्षण संस्था महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योग-व्यवसायाला चालना देवून करत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात शफाकत सय्यद यांनी जन शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या प्रशिक्षणाने जीवनात एक आत्मविश्‍वास निर्माण झाला असून, अर्थाजन करुन स्वत:चा व्यवसाय थाटण्यास प्रेरणा मिळाली असल्याची भावना प्रशिक्षणार्थी युवतींनी व्यक्त केली.


पाहुण्यांच्या हस्ते असिस्टंट ड्रेस मेकर, ब्युटी केअर असिस्टंट व भरत काम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवती व महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तर आयटीआय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवती व महिलांना उद्योग-व्यवसायात मार्केटिंग, ब्रॅण्डिंग व भांडवल कसे उपलब्ध करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता गड्डम यांनी केले. आभार रेणुका कोटा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी देशमुख, स्नेहल अनमल यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *