रॅली काढून दिव्यांग सशक्तीकरणाचा दिला संदेश; विविध स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिव्यांग विद्यार्थी भविष्यात समाजाचा उपयुक्त घटक -दत्ता गाडळकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दिव्यांग दिवस शहरातील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून दिव्यांग सशक्तीकरणाचा संदेश दिला. तर विविध स्पर्धेत दिव्यांग बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
दिव्यांग दिनाचा कार्यक्रम अहमदनगर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण उपायुक्त राधाकिसन देवढे, दिनकर नाठे, सचिन खेत्रे, राजस जोशी, रश्मी पांडव, फैसर शेख उपस्थित होते.
प्रारंभी सकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी रॅली काढली. भारत मातेच्या वेशभुषेत रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधले. रॅलीचे विद्यालयापासून सुरूवात होऊन जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, वाडियापार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीचे मार्गक्रमण झाले. टिळक रोड येथील विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.

कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा, पोस्ट वाचन स्पर्धा, चित्र वाचन स्पर्धा व क्रीडा स्पर्धा विद्यालयात पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत समीक्षा भिंगारदिवे, अदिती पालवे, गणेश भकंड, चित्रकला स्पर्धेत ज्ञानेश्वरी मैड, सार्थक गीते, सुजल नेटके, हस्ताक्षर स्पर्धेत राधिका शर्मा, ओम आवारी, आकाश मोरेओष्ट, वाचन स्पर्धेत कार्तिक गायकवाड, सुमित खाडे, शिवांजली भालेराव, चित्रवाचन स्पर्धेत समीक्षा भिंगारदिवे, ओंकार मीठे, किरण भकंड, क्रीडा स्पर्धेत आदित्य सानप, सुजित कदम, प्रतिक थोरवे, अशोक काळे, अमोल बडे, सिद्धांत दुधाले, ऋतुजा शेंडगे, वैष्णवी जपकर, आदिती पालवे, धनश्री जाधव, शितल आंधळे या विद्यार्थ्यांना बक्षिस पटकाविले.
दत्ता गाडळकर म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी कोणत्याही बाबतीत कमी दिसून येत नाही. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाल्यास ते आपले कर्तृत्व सिध्द करण्यास सक्षम आहे. क्रीडा प्रकारातील त्यांचा सळसळता उत्साह पाहून भारावलो. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक आहे. त्यांच्यातील कला-गुण अप्रतिम असून, दिव्यांग विद्यार्थी भविष्यात समाजाचा उपयुक्त घटक म्हणून पुढे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग बांधवांना सहकार्य करुन त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने क्रीडा साहित्य देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचे कौतुक करुन दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली का कार्यक्रम पार पडला. पाहुण्यांचा परिचय कलाशिक्षक शिवानंद भांगरे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम चौधरी यांनी केले आभार जगन्नाथ मिसाळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी दिव्यांग बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्युआ संख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थी व उपस्थितांना तारमा ट्रस्टच्या वतीने मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले.