रिपाईची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
मारहाण प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने झाला गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड येथील माजी नगरसेवक, त्यांची मुले व टोळीतील इतर सदस्यांवर गंभीर मारहाण प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेला असताना व सदर आरोपी पीडितांना दमबाजी करत असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रिपाई ओबीसी सेलचे विजय शिरसाठ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
18 ऑगस्ट रोजी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये न्यायालयाच्या आदेशाने माजी नगरसेवक शामीर लतीफ सय्यद त्यांची मुले व इतर टोळीतील सदस्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. जामखेड येथील दिलदार खान व त्यांचा मुलगा शाहबाज खान यांना 30 मार्च रोजी सदर आरोपींनी जबर मारहाण केली होती. रिपाई पक्षाच्या माध्यमातून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र आरोपींना पाठिशी घालून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. खान यांनी सदर प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. जामखेड न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने सर्व पडताळणी करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु जामखेड पोलिसांनी आरोपींना अजूनही अटक केलेली नाही. सदर आरोपींना पोलीस प्रशासन पाठिशी घालत असल्याने आरोपी मोकाट फिरत आहे. आरोपींकडून खान व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. आरोपी खान यांना विविध माध्यमातून दमबाजी करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, अन्यथा रिपाई वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.