युवा साहित्य संमेलनात झाला गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अहिल्यानगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नुकतेच महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अहिल्यानगर शाखेचे युवा साहित्य संमेलन शहरात पार पडले. यामध्ये बोरुडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिता राजे स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे व संमेलन अध्यक्षा अभिनेत्री तथा लेखिका गौरी देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे, जयंत वाघ, कार्यक्रमाचे संयोजक जयंत येलुलकर, प्राचार्य बाळासाहेब सागडे आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे स्वखर्चाने फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 32 वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणत आहे. या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे. तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे नेत्रदान घडवून आनले आहे. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रम सुरु आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.