सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची मागणी
रस्ता झाल्यास निसर्गाने नटलेले मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून पुढे येणार -भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगर तालुक्यातील जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला जाण्यासाठी 2 कि.मी. च्या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केली आहे.

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथून अवघ्या 8 कि.मी. अंतरावर डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणावर असलेल्या जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. या रस्त्यासाठी गुंडेगावचे जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांनी स्वखर्चातून डोंगर पोखरुन रस्ता निर्माण केला. पुरस्काराचे मिळालेले पैसे व सेवानिवृत्तीची पुंजी देखील त्यांनी या रस्त्यासाठी लावली. 1957 पासून ते या रस्त्यासाठी प्रयत्नशील असून, सदर कच्च्या रस्त्याचे काम होण्याची गरज आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याचे काम रेंगाळले गेले आहे. मात्र या कच्च्या रस्त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. दर रविवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात लपलेले हे मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येऊ शकते. यासाठी शासनाने तातडीने या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे भालसिंग यांनी म्हंटले आहे.

जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) येथील मंदिरात भालसिंग यांनी दर्शन घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. देवस्थानचे पुजारी ज्ञानेश्वर गुरव यांनी त्यांचा सत्कार केला.
या मंदिराला जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यास मंदिर परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून पुढे येणार आहे. तर प्रति जेजूरीचा अनुभव भाविकांना मिळणार आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेऊन शासन दरबारी दाद मागितली जाणार असल्याचे भालसिंग यांनी म्हंटले आहे.
