सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे पटकाविले रौप्यपदक
नगर (प्रतिनिधी)- येथील सावेडीमध्ये सायबर कॅफे चालवणाऱ्या अतुल सरडे यांचा इयत्ता सातवीमध्ये शिकणारा चि. साईराज अतुल सरडे हा बालचित्रपट कलाकार कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या तब्बल 27 भागांमध्ये अभिनयाच्या माध्यमातून झळकत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्यास रौप्यपदक प्राप्त झाले आहे. स्वामी समर्थांच्या भूमिकेतील अक्षय मुडावदकर यांनी चि. साईराज याचा उत्कृष्ट अभिनयाबद्दल सत्कार केला आहे.
वक्तृत्व, अभिनय, कथाकथन, एकपात्री आदी विविध कलांमधून झळकणारा चि. साईराज हा बालचित्रपट कलाकार सोनी मराठी वाहिनीमधील गाथा नवनाथांची या धार्मिक मालिकेच्या सुमारे 18 भागांमध्ये देखील विविध पात्रांमधून झळकलेला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत सप्तरंग थिएटर्सच्या तेरा मेरा सपना या नाटकातील अभिनयासाठी शासनाचे गुणवत्ता प्रमाणपत्र देखील त्यास प्राप्त झाले आहे.
आकाशवाणीवरील मुलाखती, विविध कलांची सादरीकरणे प्रस्तुत करणारा चि. साईराज हा श्री गणेश प्रोडक्शनच्या 87 रुपयांचा बॉलपेन या लघुपटासह उपरती, एक इच्छा अपुरी या लघुपटांच्या माध्यमातून अहिल्यानगरचे नाव राज्यपातळीवर झळकावत आहे. मैत्री कट्टा या सदरासाठी टीझर निर्मिती तसेच मोबाईल विकणे आहे व लोकमान्यांचा गणेशोत्सव या बालनाट्यांतील सहकार्य-सहभाग, वाचाल तर वाचाल सारखी लोकप्रिय झालेली नाट्यछटा अशा अनेक पातळ्यांवर हा बालकलाकार मराठी, हिंदी सिनेनाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकारांबरोबर काम करून नगरची रंगभूमी गाजवत आहे.
या सर्व यशाबद्दल श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, तसेच श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच विद्यार्थी, पालक, सप्तरंग थिएटर्स, गणेश प्रोडक्शन आणि विविध नाट्य रसिक कलाकारांनी चि. साईराजचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
राज्य नाट्य स्पर्धेला जात असताना आईचा मृत्यू झाला. तिची आठवण दररोज येते. मुलाचे हे यश पहायला आई हवी होती. मोठा कलाकार होण्याचे आईचे स्वप्न मी निश्चितच पूर्ण करेल. असे साईराज भावनिकपणे नमूद करतो.