फादर डे निमित्त वडांच्या झाडांची लागवड
प्रत्येक मुलाने आपल्या बापाच्या नावाने वडाचे झाड लावावे -भास्करराव पेरे पाटील
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहरालगत असलेल्या तपोवन परिसरात फादर डे निमित्त वडांच्या झाडांची लागवड करण्यात आली. माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन बापाचं झाड या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू कर्डिले, दादा कर्डिले, ह.भ.प. अभंग महाराज पठाडे, जय हिंदचे शिवाजी पालवे, अनिल गर्जे, भाऊसाहेब डमाळे, बबन पालवे, संजय पाटेकर, ॲड. पोपट पालवे, ॲड. संदीप जावळे, अशोक गर्जे, उद्योजक संतोष चौरे, गंगा वारुळे, मकरंद कोरडे, कानिफनाथ साबळे, किशोर कांबळे, भाऊसाहेब शिंदे, दिलीप शेकडे, दिपक पापडेजा आदी उपस्थित होते.
भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, बाप मुलांना वटवृक्षासारखी सावली देतो, प्रत्येक मुलाने आपल्या बापाच्या नावाने वडाचे झाड लावलं पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद फाउंडेशनचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
जय हिंदच्या माध्यमातून आईच्या नावाने झाड, स्मृति वृक्ष, मंदिर तेथे वटवृक्ष, एक विद्यार्थी एक झाड, गाव तेथे वटवृक्ष आणि बापाचं झाड अशा विविध संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती शिवाजी पालवे यांनी दिली. निरोगी जीवनासाठी पर्यावरणाचे प्रश्न सुटणे आवश्यक असून, पर्यावरणाचे प्रश्न वृक्षारोपण व संवर्धनेतून सुटणार असल्याचे अनिल गर्जे यांनी सांगून जय हिंदच्या कार्याचे कौतुक केले. ॲड. पोपट पालवे यांनी आभार मानले.