महिला बचत गटांचे वस्तू, विक्री व प्रदर्शन व अस्सल गावरान खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात 11 ते 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना निमंत्रण देण्यात आले. महोत्सवाच्या संयोजन समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे ना. आठवले यांची भेट घेऊन या महोत्सवला येण्याचे आमंत्रण दिले आहे.
सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात हा चार दिवसीय महोत्सव होणार आहे. यामध्ये महिला बचत गटांचे वस्तू, विक्री व प्रदर्शनाचा समावेश असून, जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून महिला बचत गट त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावणार आहेत. तर विविद्य खाद्य पदार्थांचा आस्वाद येथे घेता येणार आहे.

नाचणीचे बिस्किट, विविध पापड, आवळा, जाम, लोणचे, मसाले, गाईचे व म्हशीचे गावरान तूप, हातसडीचा तांदूळ, काळा भात, इंद्रायणी तांदूळ, गहू आदी विविध अन्न-धान्य विक्रीस उपलब्ध होणार आहेत. हस्तकलेच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनासह शिपी आमटी, पुरणपोळी, थालपीठ यांसारख्या ग्रामीण भागातील अस्सल गावरान खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. ग्रामीण भागातील उत्पादने विकत घेण्याची तसेच खवय्यांसाठीही एक पर्वणी या महोत्वसाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
ना. रामदास आठवले यांना चार दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आल्यानंतर आठवले यांनी कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे शिष्टमंडळास आश्वासन दिले. तर सातत्याने सुरू असलेल्या या सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे त्यांनी कौतुक करुन अशा प्रकारचे उपक्रम महिला सबलीकरणास हातभार लावणारे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य संयोजक पोपट बनकर, स्वागताध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक सुहास सोनवणे, एकनाथ (नाथा) भिंगारदिवे, मुश्ताक बाबा, चंद्रकांत ठोंबरे, गणेश बनकर आदी उपस्थित होते.
