• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवगामिनी फाउंडेशन व वासुदेव कुटुंबकम योग सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ByMirror

Jun 21, 2026
उत्कृष्ट योगगुरु व योगींचा सन्मान; युवक-युवतींना निरोगी जीवनासाठी योगाचा संदेश

योग ही शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती -ॲड. गायत्री गुंड


उत्कृष्ट योगगुरु व योगींचा सन्मान; युवक-युवतींना निरोगी जीवनासाठी योगाचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील शिवगामिनी मल्टिपर्पज फाउंडेशन आणि ‘वासुदेव कुटुंबकम योग ॲण्ड फिटनेस सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने भिस्तबाग महाल, तपोवन रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग शिबिर घेण्यात आले. योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि युवक-युवतींसह सर्व नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. युवक-युवती, महिला, पालक आणि योगप्रेमी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.


यावेळी योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उत्कृष्ट योगगुरु विशाल ठोकळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट योगी म्हणून राजेश्री पोहेकर, अरुषी खिलवाणी आणि सौरभ जैन यांचा शिवगामिनी मल्टिपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. गायत्री गुंड पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. योग क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून हा सन्मान करण्यात आला होता.
ॲड. गायत्री गुंड पाटील म्हणाल्या की, “योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेला ताणतणाव, विविध आजार आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी ठरतो. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज आहे.”


कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विशाल ठोकळ यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योग ही मानवाला निसर्गाशी आणि स्वतःच्या अंतरंगाशी जोडणारी शाश्‍वत जीवनशैली आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत राहते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. नियमित योगाभ्यास हा निरोगी आणि समृद्ध जीवनाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
गायत्री नेटके, अभिजीत कांबळे, किरण घोडके, दिनेश शिंदे, तुषार शेंडगे, आदित्य गुंड यांच्यासह पालक, नागरिक आणि योगप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *