विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपूर्ण परिसर बनले योगमय
निरोगी जीवनासाठी योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची देणगी -उल्हास दुगड
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व नवीन मराठी (विश्रामबाग) शाळेच्या वतीने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले. सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपूर्ण परिसर योगमय झाले होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य डॉ. अभय मुथा व राम पारेख यांनी विविध आसनाच्या प्रात्यक्षिकासह योग व प्राणायमाचे धडे विद्यार्थ्यांना दिले. यावेळी शाळेचे प्राचार्य उल्हास दुगड, विश्रामबागच्या मुख्याध्यापिका मीना पवार, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, पर्यवेक्षिका कल्पना पाठक, पर्यवेक्षक वैभव कुलकर्णी, एन.सी.सी.चे प्रमुख विकास साबळे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्हास दुगड म्हणाले की, निरोगी जीवनासाठी योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली देणगी आहे. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही तर, स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरुपतेची भावना शोधण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. मीना पवार म्हणाल्या की, योगाचे महत्त्व पटल्याने संपूर्ण जगाने त्याचा स्विकार केला आहे. भारतीयांनी देखील योग हा जीवनाचा भाग बनविण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत निलेश भालेराव यांनी केले. आभार कैलास कर्पे यांनी मानले.