वर्षभर विद्यार्थ्यांना दिले जाणार योग-प्राणायामाचे धडे
नगर (प्रतिनिधी)- सोनगाव (ता. राहुरी) येथील अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने योगाचे धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
या योग कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्फूर्तपणे सहभाग नोंदवला. योगा शिक्षक डॉ. पवार यांनी योग, प्राणायाम व ध्यानचे निरोगी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी असलेले महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. याप्रसंगी सोनगाव ग्रामपंचायतचे सरपंच अलकाताई शिंदे, सुभाष पाटील शिंदे, चंद्रभान आवडाजी अनाप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पल्लवी सजन, सुनील माळी, सविता अनाप, आशाताई अनाप, सुरेखा अनाप, शाळेतील शिक्षक वायदंडे, घोलप व इतर अनापवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
अलकाताई शिंदे यांनी अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. निरोगी जीवनासाठी योग सर्वोत्तम ठरत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी वर्षभर शाळेत विद्यार्थ्यांना योग-प्राणायामाचे धडे देण्याचा संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला.