• Tue. Jul 1st, 2025

शहरातील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस साजरा

ByMirror

Sep 29, 2024

पाळीव प्राण्यांची रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण

सर्व पाळीव प्राण्यांचे 100 टक्के रेबीज लसीकरण होणे आवश्‍यक -आयुक्त यशवंत डांगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि जायंटस्‌ वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत जायंटस्‌ ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.


या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मुकुंद राजळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, जायंटस्‌ वेलफेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दहातोंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर काळे, डॉ. अनिल कराळे, डॉ. अनिल भगत, डॉ. गणेश गव्हाणे, डॉ. विशाल ढगे, जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा पुजा पातुरकर, अनिल गांधी, अभय मुथा, डॉ. बाबासाहेब कडूस, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संजय गुगळे यांनी रेबीज लसीचे जनक फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ लुईस पाश्‍चर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस सन 2007 पासून साजरा केला जातो. यावर्षीच्या रेबीज दिवसाची संकल्पना रेबीजच्या सीमा तोडणे अशी असून, सर्वांसाठी एक आरोग्य या घोषवाक्यासह आंतरराष्ट्रीय रेबीज दिवसनिमित्त विविध उपक्रम देशभरात राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.


डॉ. दशरथ दिघे म्हणाले की, रेबीज या विषाणूजन्य आजारामुळे दरवर्षी संपूर्ण जगभरात 70 हजार पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होत असून, त्यापैकी 36 टक्के व्यक्ती भारतातील असल्यामुळे या आजाराविषयी संपूर्ण भारतात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने यावर्षीच्या रेबीज दिनानिमित्त रेबीजमुक्त भारत असा नारा दिला असल्याचे सांगितले.


आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, रेबीज हा विषाणूजन्य आजार गंभीर असल्याने सर्व पाळीव प्राण्यांचे 100 टक्के रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण करण्याची आवश्‍यकता आहे. यामुळे आजार पसरण्याची भिती टाळता येणार आहे. महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांची रेबीज रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी पाळीव प्राण्यांनाही संपूर्ण जिल्हाभरात रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण सुरू असल्याचे स्पष्ट करुन, सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये रेबीज रोग प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून आपापल्या पशुधनास रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमात पाळीव कुत्रे व मांजर तसेच घोड्यांचे रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी पाळीव प्राण्यांचे मालक आपल्या पाळीव प्राण्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब कडूस व दर्शन गुगळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर यांनी केले व आभार जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे संजय कविटकर, निता गर्कळ, महारनोर, वाल्मिक, सुनिल सुर्यवंशी, पशु पालक अजिंक्य जगताप, पराग गांधी, प्रणव गांधी, दीपक मुथा आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *