महिलांना मार्गदर्शनासाठी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन; स्वयंरोजगार, सीएसआर फंडिंगवर महिलांना मार्गदर्शन
महिलांसाठी शासनाच्या योजना, सीएसआर फंडिंग व रोजगाराच्या संधी संदर्भात विनामूल्य मार्गदर्शन -डॉ. सौ. सुनिताताई मोडक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मोडकळीस आलेल्या महिला स्वयंसेवी संस्थांना आधार देऊन त्यांना नवसंजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत त्यांनी महिलांना स्वयंरोजगार, उद्योगव्यवसाय, शासनाच्या योजना व सीएसआर फंडिंग यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे जिल्हा कार्यालय चितळे रोड, चौपाटी कारंजा येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर आयोजित कार्यशाळेला शहरासह जिल्ह्यातील बचत गटातील महिला प्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी राज्य प्रकोष्ठ समिती सचिव अनिता बोरस्ते, राज्य सदस्य सौ. भारती माळी, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सौ. प्रियंका बेरड, उपाध्यक्ष अश्विनी झरेकर, तसेच कार्यकारणी सदस्य कल्याणी बेरड, शुभांगी देशमुख, सुनिता गोपालघरे, पुनम तांबे, प्रिया शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून सध्या नाशिक विभागाचा दौरा सुरू असून, यापूर्वी नागपूर, नाशिक व अमरावती विभागात यशस्वीपणे असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, विविध उद्योग व्यवसाय, संस्थांचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रियंका बेरड यांच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरासह जिल्ह्यातून बचत गटातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
राज्याध्यक्षा डॉ. सुनिताताई मोडक यांनी सांगितले की,“अधि राष्ट्र, नंतर समिती, नंतर स्वतः” हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाभावी संस्था प्रबोधन समिती राज्यभर कार्यरत आहे. समितीच्या माध्यमातून अनेक महिलांनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेले उद्योग उभारले आहेत. अनेक महिलांमध्ये क्षमता असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना उद्योग व्यवसायाची दिशा मिळत नाही. अशा महिलांसाठी समिती विनामूल्य मार्गदर्शन करीत असून, शासनाच्या योजना, सीएसआर फंडिंग व रोजगाराच्या संधी याबाबत माहिती दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोडकळीस आलेल्या स्वयंसेवी संस्थांना संजीवनी देण्याची नितांत गरज असून, संस्थांना बळ मिळाले तर त्यांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे घडू शकते, असेही मत डॉ. मोडक यांनी व्यक्त केले. कार्यशाळेत सुमारे 130 संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सीएसआर फंडिंगसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.
सेवाभावी प्रबोधन समिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रियांका बेरड यांनी मार्गदर्शन करताना मोडकळी संस्थांना उभारी देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या आवाहन केले. तसेच संस्थांच्या हितासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार असून जिल्ह्यातील मोडकळी आलेल्या संस्थांना सीएसआर फंडिंग मिळाला तर, संस्था सुदृढ होऊन बऱ्याच क्षेत्रात रोजगार मिळेल व अहिल्यानगर जिल्ह्याची प्रगती होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. अनिता बोरस्ते यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
