• Wed. Jul 2nd, 2025

टक्केवारी, ताबेमारी व सत्तामारी रोखण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

ByMirror

Sep 7, 2024

शिवाजी महाराजांची लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय

विधानसभेत सत्तापेंढाऱ्यांविरोधात डिच्चूकावा करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचा निर्माण झालेला कर्कासूर तर समाजात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली ताबेमारी व सत्तामारी रोखण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भारतात लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती शिगेला पोहोचली, त्यातून या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जनतेच्या सर्वसमावेशक सहभागाशिवाय स्वातंत्र्य मिळणे अवघड होते, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती लोप पावली आहे. त्यातून भारतातील लोकशाहीला उतरती कळा लागली आहे. स्वातंत्र्योत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये आज मोठ्या प्रमाणात ताबेमारीतून सत्तामारी व त्यातून पुढे टक्केवारी अस्तित्वात आली. जगभरातील आदर्श शासनकर्त्यांचा दिपस्तंभ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर काही महिन्यात कोसळला. अहमदनगरसह देशातील सर्वच शहरातील रस्त्यांना खड्डेच-खड्डे आहेत आणि महामार्गाला खड्यांचा विस्तार रोजच होत आहे. यातून भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचा निर्माण झालेला कर्कासूर देशभर विस्तारत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


ताबेमारी, सत्तामारी आणि टक्केवारी यातून मिळालेल्या सत्तासंपत्तीचा वापर ढब्बूमकात्या मतदार निर्माण करण्यासाठी वापरला जात आहे. त्यातूनच शेतकऱ्यांना हजार पाचशे रूपये, लाडक्या बहिणींना मासिक पोटगी या सर्व गोष्टी म्हणजे मुंग्यांना साखर देऊन मतदारांची मतं सरकारी तिजोरीचा वापर करून खरेदी करण्याचा राजरोस प्रयोग आहे. यातून ढोंगी धर्माभिमानी राजकारणी सगळ्या मार्गांचा वापर करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


देशामध्ये लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीची राष्ट्रीय दिवाळखोरी झाल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे या देशातील प्रत्येक मतदार व नागरिक सत्तापेंढाऱ्यांच्या आहारी जाऊन स्वतःवर गुलामगिरी स्विकारण्याचा धोका निर्माण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून फुटला याबाबीतून देशातील तमाम मतदारांना जय शिवाजी जय डिच्च्यूकावा हे लोकास्त्र उपलब्ध झालेले आहे. इंग्रज गेल्यानंतर झोपडपट्ट्यांचा विस्तार होऊन दारिद्य्र वाढले आणि जातीय द्वेष टोकाला पोहोचला. यातून सर्व देशवासीयांनी जागे होऊन लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीसाठी काम करणाऱ्यांनाच निवडून दिले पाहिजे. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची लोकभक्ती, ज्ञानभक्ती व कर्मभक्तीवर आधारित शासनपद्धती हाच फक्त सर्व मानवजातीसाठीचा कल्याणकारी एकमेव मार्ग आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, ओम कदम, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *