महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण; युवकांचे उत्स्फूर्त रक्तदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने सिव्हिल हडको, सावेडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नाडी परीक्षण व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण करुन गरजूंवर उपचार करण्यात आले. तर रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या शिबाराचे उद्घाटन ट्रस्टीचे चेअरमन सय्यद साबिर अली यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त साबीर अली सय्यद, विश्वस्त महेबूब अली सय्यद, निसार अली सय्यद, जाहिद अली सय्यद, गालीब अली सय्यद, मोहम्मद अली सय्यद, रजा सय्यद, फैजान सय्यद, सरफराज सय्यद, हारुन सय्यद, जाफर अली सय्यद, हमीदुद्दीन शाह सय्यद, बिलाल सय्यद, रहेबर अली सय्यद आदी उपस्थित होते.
माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की, आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तर रक्तदानने एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान मिळते. आरोग्य सेवेतून गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
साबीर अली सय्यद म्हणाले की, धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. वेळोवेळी तपासणी झाल्यास नागरिकांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत नाही. नाडी परीक्षण आयुर्वेदाच्या माध्यमातून जीर्ण व्याधी व आजार संपविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या सहकार्याने मोफत नाडी परीक्षण व रक्तदान शिबिर पार पडले. नाडी परीक्षण शिबिरात संधिवात, त्वचेच्या समस्या, लठ्ठपणा, गॅस आणि आम्लीपित्त संदर्भात तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. मनीषा वगडखैर, डॉ. सिद्धी सोनवणे, मिलिंद भिंगारदिवे यांनी नाडी परीक्षण केले. रक्तदान शिबिरासाठी ब्लड बँकेचे स्नेहा सोनवणे, संदीप पाटोळे, वनिता श्रीपद, देविदास परभणे यांनी परिश्रम घेतले.
