शहरातील होलसेल फटाक्यांची बाजारपेठ राज्यात नावाजली गेली -आ. संग्राम जगताप
फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-मनमाड रोड, सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या होलसेल फटाका मार्केटचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक सतीश बारस्कर, दीपक खेडकर, निलेशराव खळदकर, अमोल जाधव, प्रसाद दंरदले, संकल्प राऊत, योगेश रोकडे, जालिंदर सातपुते, हरिदास सांगळे, अशोक तांदळे, राजू तांदळे, दत्तात्रय वाबळे, महेश वाबळे, गोपाल बोरुडे, बाळासाहेब महामुनी, अशोक सांगळे, सनी घोरपडे, आशिष भगत, ऋषी ताठे, अक्षय भगत, जयंत घोरपडे, योगेश भुजबळ आदींसह फटाका व्यापारी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरातील होलसेल फटाक्यांची बाजारपेठ राज्यात नावाजली गेली आहे. अनेक जिल्ह्यातून नागरिक दिवाळीनिमित्त शहरात येऊन फटाके खरेदी करतात. शहर झपाट्याने वाढले असताना उपनगराचा विस्तार होत आहे. या फटाका मार्केटने सावेडी उपनगरातील नागरिकांची सोय होणार आहे. एकाच ठिकाणी गर्दी न होता या फटाका मार्केटच्या माध्यमातून नागरिकांना फटाके उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नगर फटाका असोसिएशनचे दिपक खेडकर यांनी मागील वीस ते बावीस वर्षापासून सावेडी भागातील नागरिकांची सोय होण्यासाठी या भागातच फटाका मार्केट लावले जात आहे. या फटाका मार्केटच्या माध्यमातून सावेडी उपनगरासह नगर जिल्हा व इतर जिल्ह्यातील नागरिकांना ठोक व किरकोळ स्वरुपात नामांकित चांगल्या दर्जाचे फटाके उपलब्ध होत आहे.

कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे फटाके उपलब्ध होत असल्याने नागरिकांची या मार्केटला पसंती मिळत असल्याचे सांगितले.
दिवाळीत खास आकर्षण असलेल्या फटाक्यांच्या खरेदीसाठी सावेडी नाका येथील होलसेल फटाका मार्केटमध्ये फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, आपटी बॉम्ब, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवीन फॅन्सी फटाक्यांना मागणी आहे. आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचे नागरिकांमध्ये आकर्षण असून, आसमंत उजळून टाकणाऱ्या फटाक्यांची चलती आहे. कमी आवाज आणि फक्त रोषणाई करणाऱ्या फटक्यांची देखील नागरिक मागणी करत असल्याची माहिती फटाका व्यावसायिकांनी दिली.