पहिल्याच दिवशी सावित्री ज्योती महोत्सवाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी झुंबड
महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास साधला जाणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास साधला जाणार आहे. महिला सक्षमीकरणाची बीजे सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून रोवली. त्यामुळे आज महिला शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करत आहे. महिला बचत गटाच्या चळवळीला आधार व प्रोत्साहन देण्यासाठी सावित्री ज्योती महोत्सवचा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सुहासराव सोनवणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, शहर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. संजय पाटील, कर्तुत्वान लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष सिंधू वाणी, पोपट बनकर, सुरेश बनसोडे, शब्दगंध साहित्यिक परिषदचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात प्रवाहाविरोधात जाऊन धाडसाने उंबरठा ओलांडला. आजच्या महिलांना देखील सक्षम होऊन स्वत:चे कर्तृत्व सिध्द करण्यासाठी उंबरठा ओलांडावा लागेल. पुढची सशक्त पिढी घडविण्यासाठी मुलांच्या हातात महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेल्या महापुरुष व रणरागिणी यांचे चरित्र ग्रंथ द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात बचत गट स्टॉल विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करुन तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीच्या रोपाला पाणी घालून या महोत्सवाचे प्रारंभ झाले. भारताचे संविधान व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे यांच्या सेवापूर्तीनिमित्त पाहुण्यांचे हस्ते सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात संजय गर्जे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हाभरात महिलांना स्वयंरोजगारीत करण्यासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण देत असल्याची माहिती दिली. तर शासनाच्या वतीने महिलांसाठी असलेल्या व्यवसाय कर्ज भांडवलावर मार्गदर्शन केले. पोपट बनकर यांनी जय युवा अकॅडमी, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, समाज कल्याण विभाग मार्फत चार दिवसीय विविध उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्व घटकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात सामाजिक भावनेने उत्कृष्ट कार्य करणारे गणेश आंबेकर, बाळासाहेब देवखिळे, विनोद साळवे, ॲड. सुनील तोडकर, ॲड. अनुराधा येवले, विद्या तन्वर, दिलीप आढाव, प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, प्रा. सुनिल मतकर, चंद्रकांत ठोंबे, भाऊसाहेब ठोंबे, भाऊसाहेब पालवे, डॉ. अनिल ससाणे, संतोष शिंदे, अशोक सूर्यवंशी, बाळासाहेब वाघमारे, संदीप दरेकर, मुस्ताक बाबा, धर्मराज रासकर, भाऊसाहेब माशेरे, रजनी जाधव यांना सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पहिल्याच दिवशी सावित्री ज्योती महोत्सवाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बचत गटाच्या प्रदर्शनामध्ये इंद्रायणी तांदूळ, खपली गहू, गावरान तुप, विविध प्रकारचे पापड, मसाले, लोणचे, आवळ्याचे पदार्थ, महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने, कपडे, कापडी बॅग, लहान मुलांची खेळणी, अगरबत्ती, उन्हाळी पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले असून, खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहे. तर भेळ, सोयाबीन चिली, बाजरीची भाकरी, ठेचा, पनीर चिली विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नगरकर स्टॉलवर अक्षरश: तुटून पडले. सकाळच्या सत्रात सर्व धर्मिय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वधू-वर मेळाव्यास सर्व समाजातील वधू-वर पालकांचा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभारी ॲड. अनिता दिघे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. सुनील महाराज तोडकर, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, दिनेश शिंदे, तनीज शेख, आरती शिंदे, शेखर होले, जयेश शिंदे, मेजर भीमराव उल्हारे, रावसाहेब काळे यांनी परिश्रम घेतले.