• Tue. Nov 4th, 2025

नगर-कल्याण रोड येथील मळगंगा देवी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण

ByMirror

Oct 18, 2023

दर्शनास येणाऱ्या भाविकांची होणार सोय; नगरसेविका सुवर्णा जाधव यांचा पाठपुरावा

भविष्याचा विचार करुन शहरात दर्जेदार विकास कामे -महापौर रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नगर-कल्याण रोड, आनंद पार्क येथील मळगंगा देवी मंदिराच्या परिसरात बसविण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाले. नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या पाठपुराव्याने मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सदर काम तातडीने मार्गी लावण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक भाऊ बोरुडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संजय (तात्या) जाधव, पुनम आघाव, निर्मला कुंजीर, चंद्रकला पठारे, ज्योती जाधव, सुलोचना परभाणे, करिश्‍मा वामन, मालन (काकू) जाधव, अंजली काळुंगे, नीलिमा कारभोर, अलका नरसाळे, मंगल आघाव, अंजली मुठे, कमल बेल्हेकर, मनोज करबरे, पुजारी शशिकांत पवार, राजू वाडेकर, दीपक सांगळे, दिनकर आघाव, राजू जाधव, पप्पू जाधव, श्‍याम जाधव, सुरज जाधव, विजय जाधव, ओमकार पवार, अवधूत जाधव, विशाल गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक व भाविक उपस्थित होते.


महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महिलांची मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे सोय होणार आहे. नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या पाठपुराव्याने या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली आहे. नगर कल्याण रोड येथील पाण्याचा आठ दिवसाआड असलेला प्रश्‍न चार दिवसावर आला आहे. लवकरच शहराप्रमाणे या भागात पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. मुलभूत प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्यात येत आहे. शहरातील अंतर्गत रस्ते दर्जेदार होण्यासाठी डांबरीकरण ऐवजी काँक्रीटीकरण केले जात आहेत. भविष्याचा विचार करुन दर्जेदार विकास कामे मार्गी लावले जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे प्रश्‍न देखील सोडविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


संभाजी कदम म्हणाले की, मळगंगा मंदिर परिसराची दुरवस्था दूर करून भाविकांसाठी सोय करण्यात आली आहे. गरज तिथे शिवसेना पुढे येत असून, शहरातील नागरिकांच्या हाकेला ओ देण्याचे काम शिवसेनेच्या महापौर करत आहे. शिवसेनेचा विकासाचा रथ सुरू असून, दर्जेदार मूलभूत सुविधा देण्याचे काम नागरिकांना केले जात आहे. यामुळे शहरात विकासात्मक बदल दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.


दत्ता जाधव यांनी जागृक देवीचे ठाणे असलेले मळगंगा देवीचे मंदिर जाधव परिवाराचे देखील श्रद्धास्थान आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविक व महिला मोठ्या संख्येने येतात. भाविकांची सोय होण्यासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले असून, लवकरच संरक्षक भिंतीचे काम देखील मार्गी लावले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी विशेष प्रयत्न करणारे पप्पू जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *