शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी
युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, मयुरी जाधव, तेजस केदारी, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, प्रमोद थिटे, जमीर शेख, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती असून, त्यांच्या माध्यमातून बदल घडणार आहे. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना दिशा देण्याचे कार्य डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, आपले उचित ध्येय पूर्तीसाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. परिश्रम करणाऱ्यांमागे यश आपोआप चालून येते. सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येक क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढला तरच सामाजिक क्रांती घडेल. युवा म्हणजे ऊर्जा असून, ऊर्जेचा उपयोग योग्य दिशेने होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषणे सादर केली.
राष्ट्रीय युवा सप्ताहतंर्गत शाळेतील दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणीसाठी केडगाव येथील निदान लॅबचे सहकार्य लाभले. 12 ते 19 जानेवारी पर्यंत होत असलेल्या युवा सप्ताहानिमित्त संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
