अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना मिळणार आरोग्य सुविधा
नर्सिंग केअर सेंटर रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणारे -शिवाजी कर्डिले
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी व त्यांच्या नातेवाईकांचे मनोबळ वाढविण्यासाठी तपोवन रोड, शिवाजीनगर येथे सुरु करण्यात आलेल्या लोटस हीलिंग पॅलिएटिव्ह आणि नर्सिंग केअर या निवासी उपचार केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी लोटस हीलिंगच्या संचालिका डॉ. मनीषा शिरसाट, कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश सोनवणे, न्यूरोसर्जन डॉ. माजीद शेख, अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत पठारे, यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद काशीद आदी उपस्थित होते.

आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना अधिक काळ हॉस्पिटलमध्ये ठेवणे कुटुंबीयांना परवडत नाही. तर रुग्णाची घरी पूर्णपणे निगा राखली जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये लोटस हीलिंग पॅलिएटिव्ह आणि नर्सिंग केअर सेंटर रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणारे ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मोठ्या शहरात रुजलेली ही नवीन संकल्पना आपल्या शहरात दाखल झाली आहे. एका कुटुंबात नवरा व बायको दोन्ही नोकरी करणारे असतात. घरातील एखादा वृध्द किंवा आजारी व्यक्ती असल्यास त्याची काळजी घेण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत सुरु करण्यात आलेले निवासी उपचार केंद्रातून रुग्णांची उत्तमप्रकारे काळजी काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात लोटस हीलिंगच्या संचालिका डॉ. मनीषा शिरसाट यांनी दिर्घ काळापासून अंथरुणाशी खिळलेल्या रुग्णांची निगा राखणे ही कुटुंबीयांची सर्वात अवघड गोष्ट बनते. शहरात सुरु झालेल्या या निवासी उपचार केंद्राच्या माध्यमातून कुटुंबीय आणि रुग्ण यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. रुग्णांची शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक गरज ओळखून त्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत.
आजारपणात रुग्णांचे व नातेवाईकांचे मनोबल वाढवणे, रुग्णांच्या दुखणाऱ्या त्रासाच्या लक्षणापासून आराम देणे, अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी रोज फिजीओथेरपी, त्यांना बेडसोर होऊ नये याची काळजी घेणे, ड्रेसिंग करणे, योगा कौन्सिलिंग आणि इतर मनोरंजनांचे साधन वापरून रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे व संतुलित आहार, व्यायामातून त्यांना आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.